प्रभागांचा कानोसा - प्रभाग क्रमांक ३२ बिंदू चौक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:18 AM2020-12-25T04:18:56+5:302020-12-25T04:18:56+5:30

‘बिंदू चौक’वर झेंडा फडकविण्यास काँग्रेस सज्ज लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शहराच्या मध्यवस्तीत असूनही भौगोलिकदृष्ट्या मोठा असलेला, सर्वाधिक मतदार ...

Ward Canosa - Ward No. 32 Bindu Chowk | प्रभागांचा कानोसा - प्रभाग क्रमांक ३२ बिंदू चौक

प्रभागांचा कानोसा - प्रभाग क्रमांक ३२ बिंदू चौक

googlenewsNext

‘बिंदू चौक’वर झेंडा फडकविण्यास काँग्रेस सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : शहराच्या मध्यवस्तीत असूनही भौगोलिकदृष्ट्या मोठा असलेला, सर्वाधिक मतदार असलेला बिंदू चौक प्रभाग आपल्याकडे खेचण्यास काँग्रेस पक्ष पुन्हा सज्ज झाला आहे. गेल्या निवडणुकीत थोडक्यात हा मतदारसंघ हुकला. त्याची परतफेड करण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी आतापासूनच नियोजनपूर्वक प्रयत्न चालविले आहेत. या मतदारसंघातून अनेक मातब्बर निवडणूक लढविणार असल्याने ‘बिंदू चौक’वर कोणाचा झेंडा लागतो, हे पाहणे उत्कंठावर्धक राहील.

गेल्यावेळची निवडणूक इंद्रजित सलगर व ईश्वर परमार या आमदार पी. एन. पाटील समर्थकांत झाली. काँग्रेसकडून शब्द पाळला गेला नाही, रणजित परमार यांना कोणतेही पद दिले नाही, म्हणून त्यांचे बंधू ईश्वर परमार यांनी ताराराणी आघाडीची उमेदवारी स्वीकारली, तर सलगर यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली. परमार बंधूंनी केलेल्या टीकेमुळे त्यांचा पराभव करण्याचा काँग्रेस नेत्यांनी चंग बांधला होता. परंतु सामान्य मतदारांशी नाळ जुळल्यामुळे अटीतटीच्या लढतीत ईश्वर परमार ३७६ मतांनी विजयी झाले. अपक्ष विक्रम भोसले यांना तिसऱ्या क्रमांकाची, तर शिवसेनेच्या शारदा हिलगे यांना चौथ्या क्रमांकाची मते मिळाली होती.

गेल्या निवडणुकीत या मतदार संघावर सर्वसाधारण आरक्षण होते. यावेळी सर्वसाधारण महिला असे आरक्षण राहिले आहे. त्यामुळे ईश्वर परमार यांना पुन्हा लढण्याची संधी मिळणार नाही. त्यांनी आपल्या भावजय माजी नगरसेविका नयना परमार यांना उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. इंद्रजित सलगर किंवा सुनील सलगर यांनी त्यांच्या पत्नींना उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. सलगर यांच्या घरातील एक महिला मात्र येथून नक्की निवडणूक लढविणार आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आदिल फरास यांनीसुद्धा मतदारसंघात चाचपणी करून आपल्या मातोश्री माजी महापौर हसीना फरास यांना उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. माजी महापौर नंदकुमार वळंजू यांचे पुत्र प्रसाद वळंजू यांच्याकडूनही त्यांच्या पत्नी अमृता वळंजू यांना निवडणुकीत उतरविले जाणार आहे. प्रसाद देखील सार्वजनिक कार्यात अग्रेसर आहेत.

नाव तेच, पक्ष बदलणार?

गेल्यावेळी काँग्रेसचे असूनही परमार यांनी ताराराणी आघाडीची उमेदवारी घेतली होती. परमार यांचा या प्रभागात पूर्णवेळ संपर्क असल्याने यावेळी नयना परमार यांना काँग्रेसची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता अधिक आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडून तसे प्रयत्न असल्याचे समजते. जर तसे झाले तर सलगर बंधू काय करणार, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. कारण सलगर बंधूही काँग्रेसचेच आहेत. जर असे झालेच तर वळंजूंची उमेदवारी ताराराणी आघाडीकडून असेल.

- प्रभागातील सोडविलेले नागरी प्रश्न -

मागच्या पाच वर्षांत बिंदू चौक प्रभागात बरीच विकास कामे झाली आहेत. सर्व प्रभागात ड्रेनेज लाईन, जलवाहिनीची कामे, डांबरी रस्ते, काँक्रिट पॅसेज, बाजूपट्ट्यांची कामे झाली. जलवाहिन्या टाकल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. दोन कंटेनर वगळता संपूर्ण प्रभाग कंटेनरमुक्त प्रभाग झाला आहे. स्वनिधीतून प्रभागात एलईडी बल्ब बसविण्यात आले आहेत.

- प्रभागातील शिल्लक नागरी प्रश्न -

प्रभागात जनरल फिश मार्केट गेल्या अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहे. रोजच्या स्वच्छतेशिवाय कोणाचे लक्ष नव्हते. हे संपूर्ण फिश मार्केट वातानुकूलित तसेच आधुनिक मार्केट करण्याचा प्रकल्प रखडला आहे. केंद्र सरकारच्या पातळीवर प्रयत्न करूनही कोविडमुळे मंजुरी मिळालेली नाही. काही भागात छोटे बोळ असल्याने तेथे डांबरी रस्ते करता आले नाहीत.

कोट -

सर्वच प्रश्न सुटत नसले तरी, जास्तीत जास्त प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. रस्ते, पिण्याचे पाणी, सांडपाणी निर्गतीचा प्रश्न सोडविला. प्रभागातील कचरा रोजच्या रोज उचलण्याची यंत्रणा कार्यरत केली आहे. फिश मार्केट वातानुकूलित करण्याचा माझा प्रयत्न असून, त्याचा पाठपुरावा सुरू आहे.

- ईश्वर परमार, माजी नगरसेवक

- मिळालेली मते -

ईश्वर परमार (ताराराणी) - २०१२

इंद्रजित सलगर (काँग्रेस) - १६७०

विक्रम भोसले (अपक्ष) - ७७८

शारदा हिलगे (शिवसेना) - ६५२

बाळकृष्ण मेढे पवार (राष्ट्रवादी) - ३१६

Web Title: Ward Canosa - Ward No. 32 Bindu Chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.