प्रभाग कानोसा : शिवाजी पार्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:24 AM2021-03-18T04:24:43+5:302021-03-18T04:24:43+5:30
कोल्हापूर : गेल्यावेळी अटीतटीने आणि प्रचंड चुरशीच्या निवडणुकीचा अनुभव घेतलेल्या शिवाजी पार्क प्रभागात यावेळी मात्र आरक्षणामुळे तगड्या उमेदवारासाठी धावाधाव ...
कोल्हापूर : गेल्यावेळी अटीतटीने आणि प्रचंड चुरशीच्या निवडणुकीचा अनुभव घेतलेल्या शिवाजी पार्क प्रभागात यावेळी मात्र आरक्षणामुळे तगड्या उमेदवारासाठी धावाधाव करावी लागत आहे. स्थानिक पातळीवर सक्षम उमेदवार मिळत नसल्याने शेजारच्या प्रभागातील आरक्षणामुळे बाहेर फेकल्या गेलेल्या उपऱ्या उमेदवारांना येथे संधी देण्याची तयारी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीने केली आहे.
स्टार बझार, संगम टॉकीज, विक्रम हायस्कूल, एलिक्झा पार्क झोपडपट्टी, न्यू शाहूपुरी, शाहूपुरी जिमखाना, स्टेशनरोड, पर्ल हॉटेल, वृषाली हॉटेल, चर्च असा या प्रभागाचा विस्तार आहे. उच्चभ्रू, मध्यमवर्गीय व झोपडपट्टी अशा तीन वर्गाचे प्रतिनिधीत्व शिवाजी पार्क हा संमिश्र प्रभाग आहे. त्यामुळे येथील समस्याही तीन तऱ्हेच्या आहेत. नगरसेवक आशिष ढवळे हे ताराराणीकडून प्रतिनिधीत्व करतात. पण यावेळी येथे अनुसूचित जाती महिला आरक्षण पडल्यामुळे ते रिंगणातून बाहेर फेकले गेले आहेत. महापालिकेत कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेची सत्ता असतानादेखील स्थायी समितीचे सभापतीपद पटकावण्याची किमया ढवळे यांनी केली. प्रभागात बरीचशी कामे त्यांनी मार्गी लावल्याचेही सांगितले जाते, पण आरक्षणामुळे त्यांना यावेळी शांत बसावे लागत आहे. प्रभागात केलेल्या विकास कामांच्या पुण्याईवर त्यांनी आपला उत्तराधिकारी निवडण्याची तयारी केली आहे. ऋतुजा घाेटणे व मालती कांबळे ही दोन नावे त्यांच्याकडून पुढे येत आहेत. पण अजून यातील एकावर शिक्कामोर्तब झालेले नाही. याउलट गतवर्षी दोन नंबरवर राहिलेल्या राष्ट्रवादीने मात्र आतापासूनच जोरदार तयारी सुरू केल्याचे दिसत आहे. गतवेळी ढवळे व राष्ट्रवादीचे तत्कालीन शहराध्यक्ष राजू लाटकर यांच्यात अटीतटीची लढाई झाली होती. अवघ्या ११९ मतांनी लाटकर यांना पराभव पत्करावा लागला होता. यावेळी लाटकर व ढवळे दोघेही रिंगणाबाहेर आहेत. त्यामुळे येथे आता टाकाळा, सदर बाजार, विचारेमाळ येथील प्रभागातून विस्थापित झालेल्यांनी येथे उमेदवारी मिळवण्यासाठी तयारी सुरू केली आहे.
शिवाजी विद्यापीठातील आजी माजी विद्यार्थी संघटना कृती समितीचे प्रवीण कोडोलीकर यांच्या पत्नी योगिता यांनी राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागितली आहे. त्यांचे काम विचारेमाळ येथे असले तरी आरक्षणामुळे त्यांनी आता शिवाजी पार्कवर लक्ष केंद्रित केले आहे. येथे गतवेळी शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर राहिली होती. विश्वजीत मोहिते यांनाही आरक्षणामुळे रिंगणाबाहेर राहावे लागत असल्याने टाकाळा प्रभागातील शिवसेनेचे उपशहरप्रमुख विशाल देवकुळे यांनी पत्नी अनिता यांच्यासाठी शिवसेनेकडे उमेदवारीची मागणी केली आहे. भाजपने राष्ट्रवादी व शिवसेनेकडे उमेदवारी मागितलेल्यांनाच आपल्याकडे खेचण्यासाठीही प्रयत्न चालवले आहेत. कॉंग्रेसच्या गोटात अजूनही शांतता दिसत आहे.
विद्यमान नगसेवक: आशिष ढवळे, ताराराणी आघाडी
सध्याचे आरक्षण: अनुसूचित जाती महिला
एकूण मतदान: ६१७२
गतवेळी झालेले मतदान: ३९७२
आशिष ढवळे: ताराराणी (१५६२)
राजू लाटकर : राष्ट्रवादी (१४४३)
विश्वजीत मोहिते : शिवसेना (८०६)
सुजितसिंह देसाई: कॉंग्रेस (९२)
सूर्यकांत पाटोळे : भाकप (३२)
झालेली कामे
पाच वर्षात विकासकामावर साडेपाच कोटींचा निधी खर्च
अमृत योजनेतून आठ लाख लीटरची पाण्याची टाकी बांधून तयार, पाणीप्रश्न कायमचा मिटला.
झोपडपट्टी परिसरात नवीन ड्रेनेज लाईनसह शौचालयांची कामे पूर्ण
न्यू शाहूपुरी परिसरासह प्रभागात नवीन पाईपलाईन टाकली
गॅस पाईपलाईनचे काम मंजूर करून घेतले
विक्रम हायस्कूल चौकातील रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण केले
न झालेली कामे
विक्रम हायस्कूल समोरील आयलॅण्डचे काम रखडले आहे.
पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीचे बांधकाम अजून सुरू असल्याचे सध्या पाणी टंचाईचा सामना
झोपडपट्टी परिसरात स्वच्छतेचा मोठा प्रश्न दिसत आहे
गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणाकडे, सोई सुविधा देण्याकडे दुर्लक्ष
प्रतिक्रिया
कमी फरकाने निवडून आलो तरी सर्वांचेच समाधान होईल असे काम प्रभागात केले आहे. बऱ्याच वर्षापासूनचा विक्रम हायस्कूलसमोरील प्रलंबित रस्त्यांचे पूर्ण कॉंक्रिटीकरण करून घेतले. आठ लाख लीटरची नवीन पाण्याची टाकी बांधून घेतली. गॅस पाईपलाईन मंजूर झाली आहे, पण केलेले रस्ते उखडावे लागत असल्याने दुसरा पर्याय शोधला जात आहे. प्रभाग मोठा व विखुरलेला असतानाही बहुतांश कामे करता आली याचे समाधान आहे.
आशिष ढवळे,
नगरसेवक, शिवाजी पार्क
फोटो: १७०३२०२१-कोल- शिवाजी पार्क
फोटो ओळ: शिवाजी पार्क या प्रभागात विक्रम हायस्कूलसमोरील रस्त्यांची बऱ्याच वर्षांनी मजबूत बांधणी झाली आहे, पण येथे आयलॅण्डचे काम वर्षभरापासून रखडल्याने त्याची अशी दुरावस्था झाली आहे.
(छाया: आदित्य वेल्हाळ)