कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा पाण्याचे संकट निर्माण होत आहे. पंचगंगा आणि भोगावती नदीच्या दोन्ही काठावर उपसा बंदी लागू केली आहे. वळीव पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावली असली, तरी जिल्ह्यात दमदार पावसाने अजूनही हजेरी लावली नसल्याने पाण्याचे संकट गहिरे होत चालले आहे. राधानगरी धरणातून शेतीसाठी पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आल्यामुळे धरणातीलपाणी पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. राधानगरी धरणात गुरुवारी २७ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, तो अवघा १५ दिवस पुरण्याची शक्यता आहे.पावसाचे आगमन लांबल्यास जिल्ह्यामध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. जिल्ह्यातील प्रमुख आठ धरणांमध्येही जेमतेम पाणीसाठा आहे. नद्यांच्या पात्रांनीसुद्धा तळ गाठला असल्याने परिस्थिती चिंताजनक आहे. कोल्हापूर जिल्ह्यात अवघ्या १५ दिवसांचा पाणीसाठा उपलब्ध असल्याने पाटबंधारे विभागाकडून उपसाबंदीचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी दिली.धरणांमधील पाण्याची स्थितीजिल्ह्यासाठी वरदान असलेल्या राधानगरी धरणात २२ जून रोजीच्या आकडेवारीनुसार केवळ १.५९ टीएमसी पाणी आहे. गतवर्षी २.२२ टीएमसी पाणी होते. दूधगंगा धरणामध्ये १.२० टीएमसी पाणी असून गतवर्षी ५.९६ टीएमसी पाणी होते. तुळशी धरणामध्ये .८५ टीएमसी इतकेच पाणी असून, गतवर्षी १.४३ टीएमसी पाणी होते. कासारी धरणामध्ये ०.४४ टीएमसी पाणी असून गतवर्षी ०.६३ टीएमसी पाणी होते. कुंभी धरणामध्ये ०.८१ टीएमसी पाणीसाठा असून गेल्या वर्षी १.०१ टीएमसी पाणीसाठा होता. पाटगाव धरणात ०.७८ टीएमसी पाणी असून गेल्या वर्षी ०.९६ टीएमसी होते. कडवी धरणात ०.७६ पाणी असून गेल्या वर्षी ०.७० टीएमसी होते. वारणा धरणात १०.७० टीएमसी पाणी असून, गेल्या वर्षी याच दिवसांमध्ये १०.४७ टीएमसी होते.
विसर्गवर मर्यादाधरणातून पाण्याचा विसर्ग करण्यावर मर्यादा आल्याने नदीकाठच्या गावांसह जिल्ह्याचे पावसाकडे लक्ष आहे. राधानगरीतून ३५०, तुळशीतून २७०, वारणेतून १०३०, दूधगंगेतून ३००, कासारीतून २५०, कुंभीतून ३००, तर पाटगांवमधून २५० क्युसेक पाण्याचा गुरुवारी विसर्ग करण्यात आला आहे.
राधानगरीत ०.५९ टीएमसी मृतसाठाराधानगरी धरणात ०.५९ टीएमसी मृतसाठा आहे. या धरणातून शेतीसाठी पाणी सोडणे बंद असले तरी तुळशीतून भोगावतीत आणि तेथून पंचगंगेत पाण्याचा विसर्ग सुरू आहे.