कोल्हापूर : ‘सर्वांना जगण्याची हिंमत दिली; परंतु मीच पोलीस खात्याच्या राजकारणासमोर आज हरलो. बायकोचा दुपट्टा आणलाय... ९ मे १९९९ ला लग्नगाठ बांधली होती. आज तिच्याच दुपट्ट्याने मरणगाठ बांधतोय...’ अशा भावना आत्महत्येचा प्रयत्न केलेले पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनी व्हॉटस्ॲपवरील संदेशात व्यक्त केल्या आहेत. त्यांनी या संदेशात स्वत:वरील अन्यायाबद्दल कोल्हापूर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे बोट केले आहे.
मूळच्या हातकणंगले तालुक्यातीलच महिला पोलीस अधिकाऱ्याने स्वत:चे सासरचे राजकारण जपण्यासाठीच माझ्या करिअरचा खून केल्याचा आरोप केला आहे. माझ्यानंतर माझी बायको मुलांना घेऊन आत्महत्या करणार याची मला खात्री आहे. माझी विनंती आहे, त्यांना मरू देऊ नका, असेही त्यांनी या संदेशात म्हटले आहे.
पोलीस निरीक्षक काळे आपल्या संदेशात म्हणतात, खूप काम केले, खूप धडपडलो. पोलीस खात्याला माझ्यामुळे बट्टा लागणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली. आम्ही लोक दहा-दहा वर्षे राब-राब राबून काम करतो आणि एखादा वरिष्ठ येतो आणि तो अधिकाऱ्यांची विभागणी करून टाकतो. हा या अधिकाऱ्याचा माणूस... तो त्या अधिकाऱ्याचा माणूस... आणि काहीतरी चौकशी मागे लावतो. त्याआधारे शिक्षा देऊन दहा-पंधरा वर्षांची मेहनत क्षणात धुळीस मिळवून टाकतो.
मी महाराष्ट्रातील पहिला अधिकारी असेन, की ज्याची चौकशी घटनेच्या दोन महिन्यांनंतर वृत्तपत्रात आलेल्या एका बातमीवरून झाली. चौकशीत फक्त गुन्ह्याच्या त्रुटी शोधून कसुरी अहवाल दिला. त्यात दोन वर्षांची वेतनवाढ थांबवली. गप्प शिक्षा भोगली. आता त्याच केसमध्ये आम्ही दोन महिन्यांत केलेल्या तपासामुळे गुन्हेगारांना शिक्षा होईल. मग पोलीस खाते माझी शिक्षा मागे घेईल का आणि घेतली तरी पोलीस महासंचालक यांच्या पदकाला मुकलो, ते कुठे भरून येणार आहे...?
तीन लोकांचे प्राण वाचविले...
महापुरात स्वत:च्या जिवाची पर्वा न करता तीन लोकांचे प्राण वाचविले. त्याची दखल तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी स्वत:हून घेऊन माझ्या नावाची पंतप्रधानांच्या जीवन रक्षा पदकासाठी शिफारस केली होती. पोलीस महासंचालक पदकाच्या परिपत्रकाप्रमाणे ज्यांचे नाव जीवन रक्षा पदकासाठी शिफारस करण्यात आले आहे, त्यांचे नावही या पदकासाठी कळविण्याच्या सूचना होत्या. त्यात कसुरी अहवाल असेल तर नावे पाठवू नयेत, असे म्हटलेले नाही.
ही कोणती मानसिकता...?
माझे नाव पदकासाठी पाठवावे याची विनंती करण्यासाठी मी २५ मार्च २०२१ ला युनिट कमांडर सर यांना भेटलो. ते एवढे गरम झाले की, तुमचा कसुरी रिपोर्ट आहे, क्राईमचे काम खराब आहे, तुम्ही राजकीय दबावाखाली काम करता म्हणूनच मी तुम्हांला वडगावहून शिफ्ट केलंय असे त्यांनी बजावले. हे सगळंच अकल्पित होतं. शिफ्ट केलंय हा किती घाणेरडा शब्द आहे! लगेज शिफ्ट केले जाते. माणूस नाही. खालच्या अधिकाऱ्याकडे बघण्याची ही कोणती मानसिकता..? माझ्या आत्मसन्मान, खात्यावरची श्रद्धा यांचा खून झाला होता. ते प्रेत रोज अंगावर चढवून मी विमानतळावरील ड्यूटीला जात होतो...
पारगावचा गुन्हा व कोरे यांची ओळख...
पारगाव (ता. हातकणंगले) येथील खुनाचा प्रयत्न (कलम ३०७)च्या गुन्ह्यांत जो माझ्या काळात दाखल नाही, त्याचा तपास माझ्या काळात नाही, त्यावर माझे नियंत्रण नाही आणि तरी सासरच्या गटाचे ऐकून मॅडमने सरळ सरळ राजकीय दबाव घेतला म्हणून अहवाल दिला. तुम्ही दिशाभूल करणारे रिपोर्ट देता... हे ३०७ चे परस्परविरोधी गुन्हे एकाच कोरे गटातील असल्याने राजकीय दबाव येणार तरी कुणाकडून..? आणि मला दहा अधिकाऱ्यांत उभा केले आणि आमदार विनय कोरे यांना ओळखायला सांगितले तर तेही ओळखणार नाहीत. मग मी दोषी कसा?