कोल्हापूर : नावीन्यपूर्ण योजनेसाठी ११ कोटी रुपयांचा निधी द्यावा, याबाबत आपण दोघे बसून बोलू, असे आमदार हसन मुश्रीफ हे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना म्हणाले. यावर पालकमंत्र्यांनी तुम्ही आमच्याकडे या, असे थेट आवतनंच मुश्रीफांना दिले. यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या, तर त्यावर कोटी करत मुश्रीफ यांनी आम्ही तुमच्याकडे आल्यावर तुम्ही पक्षात घेतलेल्यांची अडचण होईल, असा टोला लगावला. यामुळे उपस्थितांमध्ये हास्याचे फवारे उडाले. रविवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चांगलीच टोलेबाजी रंगली.जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रकांत पाटील होते. बैठकीत आमदार मुश्रीफ यांनी नावीन्यपूर्ण योजनेसाठी ११ कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी करत आपण दोघे बसून यावर चर्चा करू, असे सांगितले.
यावर हसतच पालकमंत्र्यांनी थेट तुम्ही आमच्याकडे या असे आवतनं दिले. त्यावर व्यासपीठावर उपस्थित पुणे ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजित घाटगे यांचे नाव न घेता मुश्रीफ यांनी आम्ही तुमच्याकडे आल्यावर पक्षात ज्यांना घेतले आहे, त्यांची अडचण होईल, असा टोला लगावला. यावेळी सभागृहात हास्याची लकेर उमटली.
राज्य नियोजन आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष आ. राजेश क्षीरसागर हे बैठकीला अनुपस्थित होते. त्यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे आमदार हसन मुश्रीफ यांनी अभिनंदन केले. यानंतर मुश्रीफ यांनी पालकमंत्र्यांकडे पाहत काही तांत्रिक कारणांमुळे मंत्रिपद मिळाले नसल्याची खंत क्षीरसागर यांनी व्यक्त केली होती. हे तांत्रिक कारण आपल्याला काही माहीत आहे का? अशी हसतच विचारणा केली. आपण अनेकवेळा मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यावेळी आपल्याला कोणती तांत्रिक अडचण जाणवली नाही, असेही ते म्हणाले.
यावर पालकमंत्र्यांनी हसतच तुम्ही एवढी शिवसेनेची काळजी का करता? असा टोला लगावला. त्याला प्रत्युत्तर देत मुश्रीफ यांनी जिल्ह्याने सहा आमदार, दोन खासदार शिवसेनेला दिल्याने येथील जनतेला मंत्री पदाची अपेक्षा होती, अशी कोटी केली. यावर तुम्ही माझ्याबरोबर रेल्वेने या, त्यावेळी तुम्हाला तांत्रिक कारण सांगतो, असे म्हणताच उपस्थितांमध्ये हास्याचे फवारे उडाले.