सर्व दुकाने सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा करू : सतेज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 05:40 PM2021-06-21T17:40:36+5:302021-06-21T17:44:01+5:30

CoronaVirus In Kolhapur : कोल्हापूरचा कोरोना पॉझिव्हिटीचा रेट कमी होत आहे. सर्व दुकाने सुरू करण्याबाबत सोलापूर शहराप्रमाणे कोल्हापूर हे स्वतंत्र युनिट करता येईल का? याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी मंगळवारी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. आजपर्यंत तुम्ही संयमाने सहकार्य केले आहात, आणखी एक दिवस वेळ द्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाणी बिल, फायरसेसबाबत दिलासा देऊ, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी सांगितले.

We will take a decision after discussing with the Chief Minister about starting all the shops: Guardian Minister Satej Patil | सर्व दुकाने सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा करू : सतेज पाटील

कोल्हापुरात सोमवारी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे आयोजित बैठकीत पालकमंत्री सतेज पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डावीकडून धनंजय दुग्गे, संजय शेटे, चंद्रकांत जाधव, संजय मंडलिक, शिवाजीराव पोवार, संजय पाटील, राजीव परीख उपस्थित होते. (छाया : नसीर अत्तार)

Next
ठळक मुद्देकोल्हापूर शहर स्वतंत्र युनिट करण्यासाठी प्रयत्न : पालकमंत्री सतेज पाटील पाणी बिल, फायरसेसबाबत दिलासा देऊ

कोल्हापूर : कोल्हापूरचा कोरोना पॉझिव्हिटीचा रेट कमी होत आहे. सर्व दुकाने सुरू करण्याबाबत सोलापूर शहराप्रमाणे कोल्हापूर हे स्वतंत्र युनिट करता येईल का? याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी मंगळवारी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. आजपर्यंत तुम्ही संयमाने सहकार्य केले आहात, आणखी एक दिवस वेळ द्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाणी बिल, फायरसेसबाबत दिलासा देऊ, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील निर्बंधांमुळे कोल्हापुरातील व्यापार, व्यवसायाला मोठा फटका बसत आहे. सरसकट दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापारी, व्यावसायिकांकडून सातत्याने होत आहे. त्याबाबत कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजतर्फे आयोजित बैठकीत ते बोलत होते.

कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या उद्योगपती माधवराव बुधले सभागृहातील या बैठकीला खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रकांत जाधव उपस्थित होते. कोरोनाबाबतच्या तपासणीचे रोजचे प्रमाण १५ हजारांपर्यंत आहे. शहराचा पॉझिटिव्हिटी रेट साडेनऊ टक्क्यांपर्यंत आहे. दोन-तीन दिवसात तो ७-८ टक्क्यांपर्यंत येईल, असे दिसते. त्यामुळे कोल्हापूर शहर स्वतंत्र युनिट करून सर्व दुकाने सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासमवेत मंगळवारी चर्चा करणार आहे.

लॉकडाऊनमुळे व्यापार, व्यवसायाचे चक्र मंदावले आहे. त्यामुळे पाणी बिल, फायरसेसमधील वाढ कमी करून दिलासा देण्याचा प्रयत्न आहे. घरफाळ्यामध्ये सवलत दिली तर त्याचा भार राज्य शासनाने उचलावा, याबाबतही विचार सुरू आहे. राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर अर्थचक्रातील विविध घटकांना पॅॅकेजच्या माध्यमातून न्याय देण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न राहणार असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.

कोल्हापूर शहरातील सर्व दुकाने सुरू करण्याबाबत काही विशेष बाब करता येईल का? याबाबत पालकमंत्री पाटील यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील. व्यापार, व्यवसाय, उद्योगाला नवसंजीवनी देण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे खासदार संजय मंडलिक यांनी सांगितले.

सर्व दुकाने उघडण्याबाबत पालकमंत्री पाटील यांच्या पाठपुराव्यातून निश्चितपणे सकारात्मक निर्णय होईल. व्यापारी, व्यावसायिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे. पाणी बिलात दिलासा देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आमदार चंद्रकांत जाधव यांनी सांगितले.

या बैठकीत आनंद माने यांनी हॉटेल व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी. पाणी बिल, फायरसेस, परवाना शुल्क कमी करावे, अशी मागणी केली. अर्थचक्राची सद्यस्थिती लक्षात घेऊन सरसकट दुकाने सुरू करण्याची मुभा देण्याची मागणी प्रदीपभाई कापडिया यांनी केली.

यावेळी संजय पाटील, शिवाजीराव पोवार, जयेश ओसवाल, उज्ज्वल नागेशकर, मोहनभाई पटेल, शांताराम सुर्वे, अरूण सावंत, प्रवीण शहा, आदी उपस्थित होते. कोल्हापूर चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांनी प्रास्ताविक केले. सचिव धनंजय दुग्गे यांनी आभार मानले.

Web Title: We will take a decision after discussing with the Chief Minister about starting all the shops: Guardian Minister Satej Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.