कोल्हापूर : महानगरपालिकेच्या निवडणुकीत सातत्याने निवडून येणाऱ्या काही मान्यवरांना आपले प्रभाग सोडून दुसऱ्या प्रभागात जाण्याची वेळ आली आहे. ज्या भागात स्थलांतर करावे लागणार आहे, ‘तोही प्रभाग माझा जुनाच आहे’ असा दावा या मातब्बरांकडून केला जात असला तरी मतदार त्यांना स्वीकारणार का? याचे उत्तर मात्र निवडणुकीनंतर मिळणार आहे. प्रभाग बदलणाऱ्यांमध्ये शारंगधर देशमुख, सत्यजित कदम, राजेश लाटकर, भूपाल शेटे, महेश सावंत, सचिन चव्हाण, हसिना फरास, मुरलीधर जाधव यांचा समावेश आहे.
आरक्षणे निश्चित झाल्यानंतर अनेक मातब्बरांना आपले प्रभाग बदलून शेजारच्या प्रभागात जावे लागत आहे, तर काहींना आपल्या प्रभागात कारभारणीला उभे करण्याची वेळ आली आहे. आपला हक्काचा प्रभाग हातून गेल्यानंतर संबंधित माजी नगरसेवकांनी शेजारच्या प्रभागातून निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. त्यांनी तेथील आपली उमेदवारीही जाहीर करून टाकली.
महापालिकेतील काॅग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांचा ‘रंकाळा तलाव’ प्रभाग आरक्षणात अडकल्यामुळे त्यांना ‘सानेगुरुजी वसाहत’ येथून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. साने गुरुजी प्रभागातून मागच्या वेळी भाजपच्या मनीषा कुंभार विजयी झाल्या होत्या. भाजपकडून कुंभार उभ्या राहणार की संजय सावंत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम यांना ‘कदमवाडी’ प्रभाग सोडून शेजारच्या ‘कदमवाडी - भोसलेवाडी’ प्रभागात जावे लागत आहे. या प्रभागातील वैभव माने यांना ‘कदमवाडी’तून उमेदवारी दिली जाणार आहे. स्थायी समिती सभापती, उपमहापौर झालेल्या महेश सावंत यांना ‘संभाजीनगर बसस्थानक’ऐवजी ‘राजलक्ष्मीनगर’ येथून लढावे लागत आहे. टीडीआर माफियांना धक्का देणाऱ्यांना तसेच भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे धसास लावणाऱ्या भूपाल शेटे यांना शेजारील ‘सुभाषनगर’ प्रभागात उभे राहावे लागत आहे.
शिवाजी पार्क, ताराबाई पार्क येथून थोड्या मतांनी पराभव झालेल्या राजेश लाटकर यांना आता हक्काचा ‘सदर बाजार’ प्रभाग मिळाला आहे. त्यांच्या पत्नी माजी महापौर सूरमंजिरी लाटकर या ‘शाहू कॉलेज’ प्रभागातून लढणार आहेत. सचिन चव्हाण यांनाही प्रभाग बदलावा लागत आहे. त्यांना त्यांच्या जुन्या प्रभागातून म्हणजेच ‘सिद्धाळा गार्डन’ येथून, तर पत्नी जयश्री चव्हाण या ‘नाथागोळे’ येथून निवडणूक लढणार आहेत. माजी महापौर हसिना फरास यांनी त्यांचा प्रभाग मुलगा आदिल यांच्यासाठी सोडला असून, त्या स्वत: शेजारच्या ‘बिंदू चौक’मधून आपले नशीब पुन्हा अजमावणार आहेत.
‘राजारामपुरी एक्स्टेंशन’ प्रभागावर महिला आरक्षण पडल्यामुळे मुरलीधर जाधव यांना प्रभाग बदलावा लागत आहे. आता दीपक जाधव यांच्या पत्नी दीपिका जाधव या निवडणूक लढणार आहेत; तर मुरलीधर यांना ‘तवनाप्पा पाटणे हायस्कूल’ प्रभागात जावे लागणार आहे.
यांचे मार्ग झाले बंद
अजित राऊत, सुभाष बुचडे, अशोक जाधव, राजाराम गायकवाड, विजयसिंह खाडे-पाटील, विजय सूर्यवंशी, संदीप नेजदार, राहुल चव्हाण, किरण शिराळे, प्रकाश गवंडी, ईश्वर परमार, कमलाकर भोपळे, राजसिंह शेळके, दिलीप पोवार, संभाजी जाधव, शेखर कुसाळे, नियाज खान, राजू दिंडोर्ले यांचे नव्या सभागृहात येण्याचे मार्ग बंद झाले आहेत.