पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शाहू महाराजांना अभिवादन
By admin | Published: June 27, 2016 12:22 AM2016-06-27T00:22:32+5:302016-06-27T00:32:37+5:30
१४२ वी जयंती : लक्ष्मी विलास पॅलेस येथे कार्यक्रम
कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज यांच्या १४२ व्या जयंतीनिमित्त पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कसबा बावडा येथील शाहू महाराजांचे जन्मस्थळ असणाऱ्या लक्ष्मी विलास पॅलेस येथे रविवारी सकाळी सव्वाआठ वाजता भेट देऊन महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, आमदार सतेज पाटील, महापौर अश्विनी रामाणे, जिल्हाधिकारी अमित सैनी, पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सदाशिव साळोखे, कोल्हापूर महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, उपमहापौर शमा मुल्ला, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, वसंतराव मुळीक, महापालिका स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव, नगरसेवक अशोक जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते.
अहो बंटी साहेब, जाऊ दे
कार्यक्रमास पालकमंत्री, पदाधिकाऱ्यांसह आमदार सतेज पाटील हेही उपस्थित होते. यादरम्यान सर्व पदाधिकाऱ्यांच्या गाड्या जन्मस्थळ परिसरात सोडल्या होत्या. मात्र, पोलिस निरीक्षकांनी या गाड्या बाहेर काढण्याचे आदेश दिले. आमदार पाटील यांची गाडीही बाहेर काढण्यात आली. कार्यक्रमानंतर सतेज पाटील यांना चालकाने आपली गाडी यांनी बाहेर काढल्याचे सांगितले. यावर पाटील यांनी पोलिस निरीक्षकांना चांगलेच फैलावर घेतले. पाटील यांनी एस.पीं.ना बोलवा, त्यांच्याशी मी बोलणार आहे, असे सांगितले. त्याचवेळी पालकमंत्रीही तेथे आल्यानंतर देशपांडे यांनी ‘अहो बंटी साहेब, जाऊ दे’ असे म्हणत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.