कारवाईसाठी गेले, यंत्रणेअभावी परतले
By admin | Published: April 22, 2015 12:38 AM2015-04-22T00:38:34+5:302015-04-22T00:54:08+5:30
गौरवाडमधील घटना : बेकायदेशीर वाळू उपसा प्रकरणी ग्रामस्थातून संताप; कारवाईबाबत साशंक
कुरुंदवाड : गौरवाड (ता. शिरोळ) येथील कृष्णा नदीपात्रात बेकायदेशीर वाळू उपसा सुरू आहे. या वाळू उपशाविरोधात ग्रामस्थांनी महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, मंगळवारी दुपारी नृसिंहवाडी मंडल अधिकारी ए. डी. पुजारी कारवाईसाठी गेले. मात्र, कारवाईसाठी यंत्रणाच नसल्याने अधिकाऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. त्यामुळे अवैध वाळू उपसा व्यावसायिक व अधिकाऱ्यांत साटेलोटे आहे काय? असा सवाल संतप्त ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
ग्रामस्थांच्या वारंवार होणाऱ्या तक्रारीला प्रतिसाद म्हणून मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास नृसिंहवाडी मंडल अधिकारी ए. डी. पुजारी हे कर्मचारी व पोलिसांना घेऊन वाळू आवटीवर पोहोचले. मात्र, अधिकारी येत असल्याची चाहूल लागताच वाळू व्यावसायिक काही वेळातच आपल्या बोटी घेऊन निघून गेले. तसेच आलेल्या या पथकाकडे कारवाई करण्यासाठी जेसीबी अथवा ट्रक, अशी कोणतीही यंत्रणा नसल्याने कारवाई न करताच ते अधिकारी माघारी परतले. त्यामुळे या अधिकाऱ्यांच्या या कारवाईबाबत ग्रामस्थही साशंक असून, ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे. अवैध वाळू व्यावसायिक व अधिकारी यांच्यात साटेलोटे असल्याचा आरोप करीत आहेत. (वार्ताहर)
रात्री अकरा नंतर वाळू उपसा
कृष्णा नदीपात्रात आठ ते दहा ठिकाणांहून बेकायदेशीर वाळू उपसा केला जात आहे. त्यामुळे नदी प्रदूषणाबरोबरच नदीचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. पाणवट्यावर वाळू उपसा करू नये, यासाठी तहसीलदार सचिन गिरी, प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांच्याकडे ग्रामस्थ पाठपुरावा करीत आहेत. मात्र, अधिकाऱ्यांकडून दखल न घेता ग्रामस्थांच्या तक्रारीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहे. रात्री ११ नंतर बोटीने वाळू उपसा करून वाहतूक केली जाते. उजाडताच सर्व काही शांत होते. वाळू व्यावसायिकांच्या या रात्रीच्या चोरीमुळे ग्रामस्थही हतबल झाले आहेत.