आजरा - सगळीकडे स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी होत असताना आजरा तालुक्यातील कष्टकरी जनतेने श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली आमच्या स्वातंत्र्याचे काय? असा सवाल करून आजरा शहरात आज मिरवणूक काढली. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून रॅलीची सुरुवात झाली. स्वातंत्र्याची ७५ वर्षे- आमच्या स्वातंत्र्याचे काय? अशा घोषणा देत रॅली संभाजी चौकात आली. घोषणांनी चौक दणाणून सोडला. त्यानंतर तिथेच सभा झाली.
देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे कष्टकरी जनतेच्या लढ्यातून मिळाले आहे. लढून मिळविलेल्या या स्वातंत्र्याचा सन्मान करणे आणि कष्टकऱ्यांच्या मुक्तीसाठी त्यांच्या नव्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष उभा करणे हा या रॅलीचा मुख्य उद्देश आहे. स्वातंत्र्याचे ७५ वर्ष साजरे करताना कष्टकऱ्यांच्या मुक्तीसाठीचा संघर्ष चालू ठेवणे हाच खरा तिरंग्याचा सन्मान आहे असे श्रमुदचे कार्याध्यक्ष कॉ संपत देसाई यांनी सांगितले.
आमच्या वाट्याला अजून खरे स्वातंत्र्य यायचे आहे असे प्रा राजा शिरगुप्पे यांनी सांगितले. सभेत प्रा नवनाथ शिंदे, संजय घाटगे, दशरथ घुरे, हरिबा कांबळे यांचीही भाषणे झाली. रॅलीत मुकुंद नार्वेकर, प्रकाश मोरुस्कर, संतोष सुतार, निवृत्ती फगरे, नारायण भडांगे, नारायण राणे, काशीनाथ मोरे, शिवाजी भंगूत्रे, सुशीला होरंबळे, सोनाली रायकर यासह कष्टकरी स्त्री-पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आभार पांडुरंग गाडे यांनी मानले.