मुस्लिमांच्या वाट्याला काय दिले ?
By admin | Published: March 30, 2015 11:27 PM2015-03-30T23:27:38+5:302015-03-31T00:28:26+5:30
आरक्षण प्रश्न : आजऱ्यातील मुस्लिमांचा सरकारला मोर्चाद्वारे सवाल
आजरा : धर्मनिरपेक्षतेच्या नावावर गेली ६५ वर्षे विविध राजकीय पक्षांनी सत्ता उपभोगली; पण प्रत्यक्षात मुस्लिमांच्या वाट्याला सरकारने काय दिले? असा सवाल उपस्थित करीत मुस्लिम आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ‘हिंदी है हम..हिंदोस्ता हमारा’ संघटनेच्यावतीने प्रा. हुमायून मुरसल यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम बांधवांनी आजरा तहसील कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढला.
वाडा गल्ली मशिदीपासून मोर्चास सुरुवात करण्यात आली. मोर्चा छत्रपती शिवाजी पुतळ्यानजीक आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार अर्पण करण्यात आला. मोर्चा तहसील कार्यालयासमोर आल्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.
यावेळी मुरसल म्हणाले, मुस्लिम समाज हा देशातील एक मागास समाज बनत चालला आहे. मुस्लिमांमधील दारिद्रय रेषेखालील प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. मुस्लिमांचा वापर केवळ मते व राजकारणासाठी केला जात आहे. एकूण लोकसंख्येच्या केवळ साडेतीन टक्के मुस्लिम नोकरदार आहेत. किमान अकरा टक्के आरक्षणाची मागणी असताना पाच टक्के आरक्षणाचा विषय पुढे आला; पण तेही मिळेल याची शाश्वती नाही, त्यासाठी कायदा नाही.
येत्या डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रात मुस्लिम आरक्षणाचा कायदा झाला नाही; तर एक लाख कार्यकर्ते विधानसभेला घेराव घालतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी आझाद पटेल,
प्रा. आशपाक मकानदार, रमजान अत्तार, अमानुल्ला आगलावे यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. मोर्चाच्यावतीने तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना निवेदन देण्यात आले.
मोर्चामध्ये माजी सरपंच आसलम खेडेकर, दिलावर चाँद, निसार दरवाजकर, समीर चाँद, आप्पासाहेब खेडेकर, कयूम बुड्डेखान, हारुण सय्यद यांच्यासह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)