कोल्हापूर : ‘मुंबईची मैना काय म्हणते, मोबाईल देणार नाही म्हणते’, ‘एक रुपयाचा कडीपत्ता, सरकार झालंय बेपत्ता’ अशा घोषणा देणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ताब्यात घेताना पोलीस आणि आंदोलकांमध्ये शुकवारी दुपारी जोरदार झटापट उडाली. जिल्हाधिकारी कार्यालयासमाेरील चौकात हा सर्व प्रकार घडला. यावेळी मोठ्या संख्येने आलेल्या महिलांनी रस्त्यातच ठिय्या मारला.
कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्यावतीने विविध मागण्यांसाठी जेलभरो आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती. कॉ. आप्पा पाटील आणि कॉ. जयश्री पाटील यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. महावीर उद्यानामध्ये सकाळपासूनच अंगणवाडी कर्मचारी महिला एकत्र येण्यास सुरुवात झाली. या आंदोलनासाठी प्रामुख्याने शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोबाईल परत घेण्यासाठीच्या दबावतंत्राचा यावेळी निषेध करण्यात आला.
या संघटनेकडून जेलभरो आंदोलन जाहीर केले असल्याने पोलिसांनी याच चौकात तीन व्हॅन आधीच आणून ठेवल्या होत्या. उद्यानातून महिला घोषणा देत बाहेर पडल्यानंतर पोलिसांनीही व्हॅन आडव्या लावल्या. यावेळी आप्पा आणि जयश्री पाटील यांना ताब्यात घेताना विरोध झाला. पोलीस निरीक्षक राजेश गवळी जातीने या ठिकाणी उपस्थित होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी सुरूच होती. महिलांनी रस्त्यावरच ठिय्या मारला. पाठीमागून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा मोर्चा येऊ लागल्याने या महिलांना दुभाजकाच्या एका बाजूला बसण्याचे आवाहन करण्यात आले. महिलांना नेण्यासाठी अपुरी वाहने असल्याने अखेर पोलिसांच्या सुमो गाडीतून अन्य प्रमुख कार्यकर्त्यांना येथून ताब्यात घेऊन बाजूला नेण्यात आले.
सरिता कंदले, शोभा भंडारे, शमा पठाण, अर्चना पाटील, सुनंदा कुऱ्हाडे, मंगल गायकवाड, विद्या कांबळे, अनिता माने यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.
२४०९२०२१ कोल अंगणवाडी मोर्चा ०१/०२/०३
कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय चौकात जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांना ताब्यात घेताना पोलिसांशी झटापट उडाली.
छाया आदित्य वेल्हाळ