‘गोकुळ’ला गतवैभव द्यायला ते गेले होते कधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:22 AM2021-04-26T04:22:43+5:302021-04-26T04:22:43+5:30
नागाव : ‘गोकुळ’ला गतवैभव मिळवून देण्याची वल्गना काही मंडळी करीत आहेत, मात्र मुळात गोकुळचे वैभव गेलेच कुठे, असा ...
नागाव : ‘गोकुळ’ला गतवैभव मिळवून देण्याची वल्गना काही मंडळी करीत आहेत, मात्र मुळात गोकुळचे वैभव गेलेच कुठे, असा सवाल करीत, दूध संघ कसा चालतो हे दूध उत्पादकांना माहिती आहे. त्यामुळे इतर कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नसल्याची टीका माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी केली.
शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) येथील हातकणंगले तालुक्याच्या ठरावधारकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. महादेवराव महाडिक म्हणाले, जगात बाराव्या स्थानावर असणारा हा संघ आहे. संघावर शंका घेऊन चुकीच्या नजरेने पाहणे दुर्दैवी आहे. वेगळ्या अविर्भावात असणाऱ्या टीकाकारांना येणारी वेळच उत्तर देईल. ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या गोठ्यापर्यंत सेवा देणारा हा संघ आहे. उत्तम प्रतीच्या दुधाची चौदा आंतरराष्ट्रीय पारितोषिके संघाला मिळाली आहेत. आमदार पी. एन. पाटील, अरुण नरके आणि आपण या त्रिसूत्रीच्या माध्यमातून सदैव उत्पादक सभासदांचे हित जोपासले आहे. त्यामुळे राजर्षी शाहू आघाडीच्या पाठीशी ठाम राहा, एकही चूक करू नका, असे आवाहन त्यांनी केले.
गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरुण नरके म्हणाले, सेहेचाळीस वर्षे संघात कार्यरत आहे. खेळाडू असल्याने कुठे थांबायचं हे मला माहीत आहे. सेहेचाळीस वर्षात सत्ताधारी आघाडीच सत्तेत आली आहे. त्यामुळे यावेळीही सत्ताधारी आघाडीच सत्तेत येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले, छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव माने, सुरेश पाटील, दिलीप पाटील यांनी व ठरावधारक सभासदांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर, अमल महाडिक, बाळासाहेब खाडे, अनुराधा पाटील, प्रताप पाटील - कावणेकर आदी उपस्थित हाेते.
चौकट-
राक्षसी महत्त्वाकांक्षा कोणाचे हित जोपासणार
महिन्याला तीन, तेरा आणि तेवीस तारखेला दूध उत्पादकांची बिले दिल्याने त्यातून गोकुळचे वैभव कळते. काहींची सत्तेसाठी राक्षसी महत्त्वाकांक्षा बनली असून त्यातून कोणाचे हित जोपासले जाणार? याचे उत्तर सूज्ञ सभासदच देतील, अशी टीका जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी केली.
संघ बुडविणाऱ्यांची मुले रिंगणात
ज्यांनी स्वतः स्थापन केलेले दूध संघ बुडवले, त्यांची मुले आता गोकुळच्या रिंगणात असल्याची टीका करत, दूध उत्पादक शेतकरी सत्तारूढ गटाच्या मागे ठाम असल्याचे ज्येष्ठ संचालक रणजितसिंह पाटील यांनी सांगितले.
फोटो ओळी : ‘गोकुळ’ निवडणुकीच्या प्रचारार्थ शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) येथील सभेत महादेवराव महाडिक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अरुण नरके, सत्यजित पाटील-सरूडकर, अमल महाडिक, अनुराधा पाटील आदी उपस्थित हाेते. (फोटो-२५०४२०२१-कोल-गोकुळ)