सांगली : कायद्याच्या, नियमांच्या चाकोरीत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या लेखी भावनेला किंमत नसते. तरीही एका तीन वर्षीय कोवळ््या मुलाच्या मरणासन्न अवस्थेने या सांगलीतील अधिकाऱ्यांच्या भावनाशीलतेला हात घातला. मायेचा पाझर असा फुटला की नियमात न बसणारी शस्त्रक्रिया वर्गणीतून पार पडली आणि एका बालकाला जीवदान मिळाले. सामाजिक जाणिवेतून केलेल्या या कार्याचा आनंद आता अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत आहे. कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील हर्षवर्धन सुनील शिंदे... वय जेमतेम तीन वर्षे... खेळण्या-बागडण्याचे वय... पण या वयातच त्याला ब्रेनट्युमरसारख्या आजाराने ग्रासले आणि त्याच्या चेहऱ्यावरील हास्यच हरवून गेले. मोलमजुरी करणाऱ्या या कुटुंबाची घरची परिस्थिती हलाखीचे असल्यामुळे उपचाराचा तीन लाखांचा खर्च त्यांना परवडणारा नव्हता. कऱ्हाड, मुंबई, पुणे येथील मोठ्या रुग्णालयांनी त्यांना झिडकारले. यामुळे हताश पालक त्या बालकास घेऊन मदतीसाठी मंगळवारी जिल्हा परिषदेत आले. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे कोणत्याही योजनेतून जिल्हा परिषद किंवा कोणताही शासकीय विभाग त्या मुलाला मदत करू शकत नव्हता. मात्र, मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांचे मन या शासकीय हतबलतेने अस्वस्थ झाले. शासकीय नियम बाजूला ठेवून त्यांनी स्वत: पुढाकार घेतला. खातेप्रमुखांना लोकवर्गणी काढण्याची विनंती केली. क्षणाचाही विलंब न लावता त्या बालकावर शस्त्रक्रिया करण्याची सूचना केल्यानंतर खासगी रुग्णालयातील डॉ. मदन जाधव यांनी अत्यंत गुंतागुंतीची सलग सहा तासांची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली.जिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद पाटील व डॉ. अनुराधा पाटील यांनी हर्षवर्धन शिंदे याची आरोग्य तपासणी केली होती. त्यावेळी ब्रेनट्युमर असल्याचे निदर्शनास आले. बालकाला मोफत शस्त्रक्रियेकरिता कऱ्हाड, पुणे व मुंबई येथील मोठ्या खासगी रुग्णालयांकडे पाठविले. (पान १० वर)अशी होणार मदत...सतीश लोखंडे यांनी स्वत: ठरावीक रक्कम देण्याची तयारी दर्शविली आहे. खातेप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांकडून दीड लाख रुपये जमा झाले आहेत. उर्वरित दीड लाख रुपयांची गरज असून, सेवाभावी संस्था, उद्योजकांनी आर्थिक मदत करावी. मदतीकरिता डॉ. प्रसाद पाटील यांच्याशी (मोबाईल क्र. ८०५५६६६८०२) संपर्क करावा, असे आवाहन लोखंडे यांनी केले आहे.
अधिकाऱ्यांना मायेचा पाझर फुटतो तेव्हा...
By admin | Published: April 22, 2015 12:51 AM