राजाराम लोंढेकोल्हापूर : महापूर, अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी अगोदरच आर्थिक अरिष्टात सापडला असताना परतीच्या पावसाने त्यांचे पुरते कंबरडे मोडले आहे. महापुरातील नुकसानभरपाई अद्याप सरकारच्या तिजोरीत असल्याने परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई कधी मिळणार? मायबाप सरकार पंचनाम्यासाठी बांधावर कधी येणार? पिके काढायची की पंचनाम्यासाठी तशीच ठेवायची? या चिंतेत शेतकरी आहे.साधारणत: कोल्हापूर जिल्ह्यात आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत परतीच्या पावसाचा मुक्काम असतो. पडेल तिथेच पडेल, त्यात सातत्य नसायचे. त्यामुळे आॅक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत खरिपाची काढणी होऊन रब्बीच्या पेरण्या सुरू होतात; पण यंंदा नोव्हेंबर उजाडला तरी पाऊस पाठ सोडत नाही.
आॅक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून खरीप काढणीसाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे; पण एकसारखा पाऊस तोही ढगफुटी झाल्याने खरीप काढणीचे धाडस होत नाही. जोरदार पावसाने उभी पिके जमीनदोस्त झाली आहेत. पिकांवर पाणी उभा राहिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.महापूर व अतिवृष्टीने पिके गेली. त्यातून राहिलेली पिके परतीच्या पावसाने गेली. महापुरात बाधित शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा सरकारने केली; पण अद्याप याद्यांचा घोळच सुरू आहे. महापूर ओसरून तीन महिने झाले तरी कर्जमाफी याद्यांतच अडकल्याने शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा वाढत आहे.
ऊसपीक महापुरात गेले, भात, सोयाबीन परतीच्या पावसाने घालविल्याने आता जगायचं कसं? या प्रश्नाने शेतकरी चिंतेत आहे. गेले दोन-तीन दिवस पावसाने काहीशी उसंत घेतल्याने उरली-सुरली पिके काढणीसाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे.
काढणीपूर्वी पाहणी करून नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करणे अपेक्षित होते; पण कृषी व महसूल विभागाची यंत्रणा अद्याप थंडच आहे. कुजलेली पिके काढायची की पंचनाम्याची वाट पाहत तशीच ठेवायची? मायबाप सरकार आमच्या बांधावर येणार तरी कधी? या विवंचनेत शेतकरी आहे.अस्मानी संकट पहिल्यांदाचशेतकऱ्यांना नैसर्गिक संकटे नवीन नाहीत; पण महापूर, अतिवृष्टी आणि परतीचा पाऊस अशी एकामागून एक अस्मानी संकटे पहिल्यांदाच आली. या संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकारच्या मदतीची गरज आहे; पण सरकारी यंत्रणेची गती पाहता तातडीने मदत मिळणे कठीण वाटते.
शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना सरकारी यंत्रणा सुस्तच आहे. पंचनामा होत नसल्याने पिके काढायची की नाही? हेच कळत नाही. राज्यकर्त्यांनी बांधावर जाऊन पाहणी करण्यापेक्षा तातडीने पंचनामे करून मदत द्यावी.- माणिक शिंदे ,शेतकरी, शिये