देवस्थान समितीतील गैरव्यवहारांची सध्या जोरदार चर्चा आहे; परंतु ज्यांच्या काळात हे प्रकार झाले, ते अध्यक्ष सध्या सत्तेत नाहीत व सचिवांचीही नुकतीच मुदत संपली आहे. सचिवांनाही जेसीबी घेण्यासाठी कर्ज हवे होते म्हणून देवस्थानच्या ठेवी शाहूपुरीतील बँकेत ठेवल्या व कर्ज उचलल्याची तक्रार आहे. दोन दिवसांपूर्वी रंकाळ्यावर त्याची खुमासदार चर्चा सुरू होती. त्यावर कमळाच्या कार्यकर्त्याने हसून उत्तर दिले..राजा तसा असेल तर, मग प्रधानानेही तरी का मागे राहावे साहेब...
आज्जा चला की तिरडीवर..
तशी घटना जुनी आहे; परंतु त्याची चर्चा रविवारी नव्याने घडली. विषय अर्थातच कोविड मृत्यूचा होता. शिवाजी पेठेत एका आजोबांचे निधन झाले. त्यांची तिरडी बांधण्याचे काम रस्त्यावर चालू होते. त्या आजोबांच्या लहान भावाचा नातू हे सगळे कुतुहूलाने पाहत होता. त्याने तिरडी बांधणाऱ्यास विचारले...काका हे तुम्ही काय करताय..? तो कार्यकर्ता म्हणाला, हे बांधून झाले की तुमच्या निधन झालेल्या आजोबांना आणून झोपवले जाते व स्मशानभूमीत नेऊन अंत्यसंस्कार केले जातात. तिरडी बांधून झाल्यावर कुणीतरी आवाज दिला... आजोबांना घ्या बाहेर... तो नातू शेजारच्या घरी बसलेल्या आजोबांकडे पळत पळत गेला व म्हणाला... आजोबा आजोबा चला लवकर... ते काका तिरडीवर झोपायला तुम्हाला बोलावत आहेत. हे ऐकून त्या आजोबांची व तिथे दु:खमग्न स्थितीत बसलेल्या लोकांचीही हसून पुरेवाट झाली..