गुंडाचे तरुणास चाबकाचे फटके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 01:13 AM2018-01-13T01:13:04+5:302018-01-13T01:13:04+5:30
कोल्हापूर : खून, खुनाचा प्रयत्न, हाणामारी, दहशत, आदी गंभीर गुन्हे दाखल असलेल्या राजेंद्रनगर येथील सराईत गुन्हेगाराने तरुणास गुुरुवारी (दि. ११) भररस्त्यावर चाबकाने मारहाण केली. अक्षय ऊर्फ आकाश वाल्मीक फुलोरे (वय २२, रा. राजेंद्रनगर) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी संशयित विश्वनाथ ऊर्फ बिल्डर सौदागर कांबळे (रा. राजेंद्रनगर) याच्यावर राजारामपुरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला.
अधिक माहिती अशी, अक्षय फुलोरेचा भाऊ रोहित याने बिल्डरच्या बहिणीला पळवून नेले आहे. ते दोघे कुठे लपून बसले आहेत याची माहिती अक्षयला असल्याचे त्याला समजले. गुरुवारी रात्री अक्षय कट्ट्यावर बसला असताना बिल्डर तिथे आला. त्याने रोहित व माझी बहीण कुठे आहेत, अशी विचारणा केली. त्याने मला माहिती नसल्याचे सांगितले. त्याचा राग येऊन बिल्डरने त्याला भररस्त्यावर चाबकाचे फटके पाठीवर, पोटावर मारून जखमी केले.
दोनवेळा तडीपारची कारवाई
राजेंद्रनगर परिसरात बिल्डर कांबळेची प्रचंड दहशत आहे. लहानपणापासूनच तो गुन्हेगारी क्षेत्रात आहे. खून, खुनाचा प्रयत्न, हाणामारी, चाकूहल्ले, धमकावून पैसे काढून घेणे, घरात घुसून मारहाण करणे, महिला, तरुणींची छेडछाड असे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. पोलिसांनी एक-दोन वेळा त्याच्यावर तडीपारचीही कारवाई केली आहे.