सोलापूरचे झाले, मग कोल्हापूरला का नाही?
By Admin | Published: April 22, 2015 12:03 AM2015-04-22T00:03:12+5:302015-04-22T00:28:48+5:30
विमानसेवेचा प्रश्न रखडला : पाठपुरावा थांबला; शहरवासीयांतून नाराजी
कोल्हापूर : मुंबई-सोलापूर-मुंबई अशी जूनपासून विमानसेवा सुरू होण्याच्या दिशेने पाऊल पडले आहे. सोलापूरमधून १९ आसनक्षमतेच्या विमानाद्वारे सेवा पुरविण्यास खासगी कंपनी तयार होते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून कोल्हापुरातून विमानसेवा सुरू होण्याची निव्वळ चर्चा सुरूच आहे. कंपनी येते, सर्व्हे करते आणि ठरावीक प्रवासी रोज मिळाले पाहिजेत, अशी अट घालते. त्यासह आश्वासनाशिवाय दुसरे काही झालेले नसल्याचे चित्र आहे. लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा याबाबत कमी पडत असल्याने विमानसेवा प्रारंभाचा प्रश्न रखडल्याची नाराजी कोल्हापूरकरांतून व्यक्त होत आहे.कोल्हापूरच्या औद्योगिक, व्यावसायिक विकासाच्या दृष्टीने विमानसेवा सुरू होण्याची आवश्यकता आहे. ते लक्षात घेऊन विमानसेवा पुरविण्यासाठी जेट एअरवेजने गेल्या चार महिन्यांपूर्वी तयारी दर्शविली. त्यानुसार ‘जेट एअरवेज’ने सर्व्हे केला. त्यातून कंपनीने कोल्हापूरहून मुंबईला जाताना ४०, तर मुंबईहून कोल्हापूरला येताना ४५ प्रवासी रोज देण्याची हमी कोल्हापुरातील उद्योजक-व्यावसायिक संघटनांनी द्यावी; तसेच तिकीट दर सात हजार रुपये राहील, अशा काही तत्त्वत: अटी ठेवल्या. पण, साडेतीन ते साडेचार हजार रुपयांपर्यंत तिकीट दर सोयीस्कर असल्याचे स्थानिक उद्योजक, व्यावसायिक आणि प्रवाशांचे म्हणणे आहे.
त्यातच विमानसेवेचा प्रारंभ अडकला. त्यानंतर एक महिन्यांपूर्वी ‘एअर इंडिया’ने विमानसेवा सुरू करण्याबाबत सर्व्हे केला आहे. त्यानुसार त्यांना रोज ५० ते ५५ प्रवाशांची हमी हवी आहे. यातून मार्ग काढण्यासाठी लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा महत्त्वाचा ठरणारा आहे. (प्रतिनिधी)