कायद्याची बूज राखता तर दोन वर्षापुर्वी एफआरपीचे तुकडे का पाडले : शेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 05:41 PM2017-10-31T17:41:42+5:302017-10-31T17:47:57+5:30
ऊस दर नियंत्रण समिती पहिली उचल नव्हते ऊसाचा अंतिम दर ठरविते, याची माहिती माझ्यावर टीका करणाऱ्यानी घ्यावी. कायद्याची भुज राखणाऱ्या हसन मुश्रीफ यांनी दोन वर्षापुर्वी कोणत्या कायद्याने एफआरपीचे दोन तुकडे पाडले? असा सवाल करत अशी धमकी देऊन चळवळ मोडत नसते, याचे भान ठेवावे. असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
कोल्हापूर : ऊस दर नियंत्रण समिती पहिली उचल नव्हते ऊसाचा अंतिम दर ठरविते, याची माहिती माझ्यावर टीका करणाऱ्यानी घ्यावी. कायद्याची भुज राखणाऱ्या हसन मुश्रीफ यांनी दोन वर्षापुर्वी कोणत्या कायद्याने एफआरपीचे दोन तुकडे पाडले? असा सवाल करत अशी धमकी देऊन चळवळ मोडत नसते, याचे भान ठेवावे. असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
‘स्वाभिमानी’ ची शनिवारी जयसिंगपूर येथे ऊस परिषद झाल्यापासून राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी खासदार राजू शेट्टी यांच्यावर टीका करण्यास सुरूवात केली आहे. ‘कायद्याने ऊस दर देणे बंधनकारक असताना दर जाहीर करणारे शेट्टी कोण?’ असा सवाल करून शेतकरी संघटनेला अंगावर घेणारे राज्यातील एकमेव साखर कारखानदार आहेत.
या टीकेचे पडसाद शेतकरी संघटनेत उमटले असून खासदार राजू शेट्टी म्हणाले, ऊस दर नियंत्रण समितीमध्ये अंतिम दर निश्चित केला जातो. या समितीत आपण असतानाही या मंडळींनी कारखान्यांचे आर्थिक वर्ष बदलण्याचा केलेला प्रयत्न आम्ही हाणून पाडला. आमच्या ऊसाला किती दर पाहिजे याची मागणी केली म्हणून मुश्रीफ यांचा एवढा तीळपापड का झाला.
मुश्रीफ एवढीच कायद्याची बूज राखतात तर दोन वर्षापुर्वी एफआरपी देण्यासाठी कारखान्यांकडे पैसे नव्हते त्यावेळी दोन तुकड्यात पैसे दिले, त्यावेळी कायदा कोठे गेला. कारखान्यांची परिस्थिती पाहून आम्हीही व्यावहारिक तोडगा मान्य केला. आता शेतकरी दुष्काळाने होरपळत आहे, कर्जमाफीच्या लाभाचा सर्वात जास्त फटका ऊस उत्पादकांना बसला आहे.
साखरेचे दर चांगले असल्याने कारखान्यांची परिस्थिती चांगली असल्याने चार पैसे जादा मागितले म्हणून लगेच कायद्याची भाषा आम्हाला कोणी सांगू नये. उठसूठ धमकी देऊन चळवळ मोडत नसते, याचे भान मुश्रीफ यांनी ठेवावे.
हसन मुश्रीफ यांना बेड्या ठोकून तुरूंगात डांबण्याची भाषा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील करत होते. तेच पाटील कधीपासून मुश्रीफ यांना आध्यात्मिक वाटू लागले? हे कळत नसून ही तर नवीन राजकारणाची समीकरणे आहेत. पण अशा समीकरणाने आमच्या चळवळीला फरक पडत नसल्याचेही शेट्टी यांनी सांगितले.