महाडिकांनी भीमा एज्युकेशन सोसायटीचा घरफाळा का भरला नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:24 AM2021-03-08T04:24:21+5:302021-03-08T04:24:21+5:30
काेल्हापूर : माजी खासदार धनंजय महाडिक भोगवटादार असलेल्या भीमा एज्युकेशन सोसायटीचा कागल नगरपालिकेचा घरफाळा त्यांनी का भरलेला नाही, असा ...
काेल्हापूर : माजी खासदार धनंजय महाडिक भोगवटादार असलेल्या भीमा एज्युकेशन सोसायटीचा कागल नगरपालिकेचा घरफाळा त्यांनी का भरलेला नाही, असा सवाल माजी उपमहापौर अर्जुन माने, माजी स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण, माजी नगरसेवक तौफिक मुल्लाणी यांनी पत्रकाद्वारे केला आहे. आशिष ढवळे यांनी केलेल्या आरोपाचा त्यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला. ढवळे घोडेबाजार करून स्थायी समिती सभापती झाले असल्याचा आरोपही त्यांनी केला.
यामध्ये म्हटले आहे की, महाविकास आघाडीच्या माध्यमातून कोल्हापूरच्या जनतेच्या हितासाठी अनेक योजना महापालिकेच्या माध्यमातून राबविल्या आहेत. त्यामुळे आशिष ढवळे यांनी आम्हाला महापालिकेच्या हिताबाबत शिकवू नये. उलट घोडेबाजार करून स्थायी सभापती झालेल्या ढवळे यांनी काय काम केले याचे आत्मपरीक्षण करावे. महाडिक यांनी पाच वर्षे खासदार असताना महापालिकेसाठी किती निधी दिला. त्याचबरोबर महादेवराव महाडिक अठरा वर्षे विधान परिषदेचे आमदार असताना त्यांनी शहरासाठी किती निधी दिला, याची आकडेवारी एकदा जाहीर करावी. रोजगार देण्याऐवजी तो काढून घ्यायचे काम माजी खासदार यांनी केले आहे. भीमा एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून सुरू असलेले विकासवाडी येथील इंजिनिअरिंग कॉलेज बंद पडले आणि तेथील कर्मचारी बेरोजगार झाले.