कोल्हापूर : गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या नियोजित कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाचा प्रश्न निकालात निघण्याची शक्यता आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन समितीची उद्या बुधवारी गोव्यात बैठक होणार असून यात या रेल्वे मार्गाचा विषय अजेंड्यावर घेण्यात आला आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन सल्लागार समितीचे सदस्य खासदार धनंजय महाडिक व सदस्य ललित गांधी यांनी हा विषय अजेंड्यावर आणला आहे. कोल्हापूर -वैभववाडी रेल्वे मार्गाला तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या काळात मंजूरी देण्यात आली होती. १०७ किमीच्या या मार्गाचे दोनवेळा सर्व्हक्षण करण्यात आले. मात्र, पुढे यावर कोणतीच कार्यवाही झाली नसल्याने हा मार्ग अद्यापही कागदावरच राहिला आहे. या रेल्वे मार्गावर अनेक ठिकाणी चढउतार असल्याने पुन्हा यातील २७ कि.मीचे फेरसर्व्हक्षण करण्यात येणार आहे. त्यानंतरच या कामाची निविदा काढण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक नरेश लालवाणी यांनी दोन महिन्यांपूर्वी सांगितले होते. पण पुढे यावर काहीच झालेले नाही. उद्या बुधवारी होणाऱ्या बैठकीत हा विषय प्रामुख्याने चर्चिला जाणार आहे.
रो रो सेवा सुरु करण्याची मागणीकोकणातील आंबा व तत्समवर्गीय फळे वाहतूकीसाठी कोकण ते मुंबई या मार्गावर रो रो सेवा सुरु करा अशी मागणी ललित गांधी यांनी कोकण रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. यासह प्रवाशांसाठी अद्यायवत सुविधा, पार्सल बुकिंग या मागण्यांवरही या बैठकीत चर्चा होणार आहे.
कोकण व दक्षिण महाराष्ट्राच्या विकासासाठी कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्ग तातडीने होणे गरजेचे आहे. उद्याच्या बैठकीत यावर चर्चा होणार असून हा मार्ग लवकर पूर्ण करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने मी प्रयत्नशील आहे. - ललित गांधी, सदस्य, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन सल्लागार समिती.