कोल्हापूर : कानडी भाषकांची संघटना असलेल्या कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या अध्यक्षाने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना सीमेवर उभे करून गोळ्या झाडल्या पाहिजेत, असे वक्तव्य केले होते. यावर शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे.
जालियनवाला बाग हत्याकांडासारख्या म ए समितीच्या नेत्यांना गोळ्या घालण्याचे कोण बोलत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. हे लज्जास्पद वक्तव्य आहे. स्वातंत्र्यानंतर अशी भाषा होत असेल तर वेळ आणि स्थळ सांगा, असे आव्हान शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी कनसेच्या नेत्याला दिले आहे. आम्ही त्याला चोख उत्तर देण्यासाठी आम्ही समर्थ आहोत, असेही माने म्हणाले.
कर्नाटकच्या सीमालढ्यामध्ये अनेकांनी गोळ्या झेललेल्या आहेत. इंग्रजांनीही गोळ्याच झाडल्या होत्या. त्यांच्याकजून स्वातंत्र्य मिळवले. आता आम्ही बघू की कर्नाटकच्या गोळ्या कमी पडतात की आमची छाती, असे आव्हानही यांनी दिले. अशा संघटनांना गृहमंत्र्यांसोबत पत्रव्यवहार करणार आहोत. अशा संघटनांमुळे देशातील एकता धोक्यात येत असेल तर अशा संघटनांवर बंदी आणावी, शिवसेनेचे खासदार लोकसभेत हा प्रश्न मांडणार असल्याचे माने म्हणाले. येत्या काही दिवसांत मी म ए समितीच्या नेत्यांना भेटण्यास जाणार असल्याचे माने म्हणाले.
कर्नाटक नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांनी मराठी भाषक आणि कर्नाटकमधील मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी झगडणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीविरोधात गरळ ओकली आहे. ''गेल्या 64 वर्षांपासून बेळगावच्या जनतेला वेठीस धरणाऱ्या आणि बेळगावातील कन्नड भाषिकांच्या स्वाभिमानास आव्हान देणाऱ्या, कर्नाटकमधील सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना खासदारांनी कधी जाब विचारला आहे का?, खरंतर मराठी भाषिक एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना सीमेवर उभे करून गोळ्याच झाडल्या पाहिजेत. एकदाच काय ते होऊन जाऊ दे. तसे झाल्यास आमचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा असेल, असे विधान भीमाशंकर पाटील यांनी केले होते.