कोल्हापूर : गझल गायक विजय पाठक यांनी जिद्दीच्या जोरावर मेरी आवाजही पेहचान है या आगळ्या पेशकशीत बहारदार गायनाने श्रोत्यांकडून वाहवा मिळवली. सोमवारी रात्री संगीतसुर्य केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये विजय पाठक यांनी आपले पुनरागमन जोरदार मैफिलीने साजरे केले.
स्वरयंत्रात निर्माण झालेल्या गाठीमुळे पाच वर्षे सार्वजनिक व्यासपिठापासून दूर रहावे लागलेल्या या कलाकाराचे हे पुनरागमन रसिकांसाठी चिरस्मरणीय ठरले. अशक्य वाटावा असा हा प्रवास साकारुन दाखवणारा विजय उपस्थितांना प्रेरणा देऊन गेला. उपस्थित सर्वांनीच विजय यांच्या अजोड मनोबलाला दाद दिली.आपल्या संघर्षमय प्रवासात सातत्याने प्रेरणा व आधार देत राहिलेल्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जब कोई बात बिगड जाए, अशी साद घालत विजय यांनी कार्यक्रमाला सुरुवात केली. का करु सजनी, मेरा दिल मचल गया अशी एकापेक्षा एक बहारदार गीतं सादर करत जेव्हा त्यांनी यमन रागातील आगळं वेगळं फ्यूजन सादर केले, तेव्हा हा कार्यक्रम एका आगळ्या उंचीवर पोहोचला होता.
या फ्यूजनमधील जो गुजर गयी वो कलकी बात थी हे गीत तर विजय यांचेच मनोगत बनून समोर आले. या गाण्यामुळे रसिकांचे ह्दय हेलावून गेले. पुढे याच फ्यूजनमध्ये जेव्हा त्यांनी मेरी आवाजही मेरी पेहचान है या गाणे गायिले,तेव्हा तर अख्ख्या नाट्यगृहाने त्याला आपसूक जबरदस्त दाद दिली. असाच प्रतिसाद मेडलीच्या प्यार का पहला खत, रोजा जानेमन ते तुही रेअशा फिरत्या तडक्यालाही मिळाला. यानंतर सादर झालेल्या ऐ मेरी जोहराजबी आणि यारी है इमान मेरा या पेशकशींना तर रसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेत वन्समोअरही दिले. नाट्यगृहात रसिकांनी या दोन्ही गाण्यांवर ठेकेदार नर्तनच केले.
ऐ मेरी जोहराजबी आणि यारी है इमान मेरा या पेशकशींना तर रसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेत वन्समोअरही दिले. नाट्यगृहात रसिकांनी या दोन्ही गाण्यांवर ठेकेदार नर्तनच केले.
भैरवीने सांगता झालेल्या या कार्यक्रमात, तबल्यावर चंद्रकांत कागले, व्हायोलिनवर केदार गुळवणी, ड्रमवर संजय साळोखे, ढोलकवर संतोष सुतार यांच्यासह शैलेंद्र काटे, भुषण साटम, रितीक, श्रीलेखा पाटील व सायली सुर्यवंशी असा नव्या-जुन्या दमदार साथीदारांचा मेळ होता.
जितेंद्र देशपाडे यांच्या आटोपशीर पण प्रभावी सूत्रसंचलनाने कार्यक्रमाची उंची अधिकच वाढली. विजय यांचाआवाज पुन्हा ऐकण्याच्या तीव्र लालसेने जमलेल्या दर्दी श्रोत्यांच्या गर्दीला मिळालेली ही अविट भेट महाभारत कन्स्ट्रकशन्सच्या जयेश कदम यांच्या कल्पनेतून साकारली होती.