कोल्हापूर : छत्रपती शिवाजी, छत्रपती शाहू महाराजांनी दुष्काळ निवारण, जलसंधारण, शिक्षण आणि बहुजनांचा विकास हे विचार त्यांच्या कृतींतून समाजासमोर मांडले. आज याच आदर्श विचारांच्या आधारावर केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील युतीचे सरकार वाटचाल करीत आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे बोलताना क ाढले. काम करताना ज्या वेळी आम्हाला अडचणी येतील, त्यावेळी शाहूंचे ग्रंथ आम्ही उघडून बघू आणि त्याद्वारे बहुजनांचा विकास करू, असेही ते म्हणाले. राजर्षी शाहू चरित्रसाधने प्रकाशन समिती, मुंबई यांच्या वतीने संपादक प्रा. रमेश जाधव लिहिलेल्या राजर्षी शाहू गौरव ग्रंथाचे प्रकाशन शानदार सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पार पडले, त्यावेळी ते बोलत होते. या सोहळ्यास पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे, श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, खासदार संभाजीराजे छत्रपती, महापौर अश्विनी रामाणे, आदी व्यासपीठावर उपस्थित होते. शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार सांगून निवडणुका जिंकता येतील, टाळ्या मिळविता येतील; परंतु त्याही पलीकडे जाऊन हे विचार सत्तेच्या माध्यमातून प्रत्यक्ष कृतीत उतरवावे लागतील तेव्हाच शाहूंना अभिप्रेत असलेला बहुजनांचा विकास होईल, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, बहुजनांच्या विकासाशिवाय समाजाचा विकास होणार नाही, हे शाहूंनी ओळखले होते. तोच विचार घेऊन आम्ही काम करीत आहोत. केंद्रातील मोदी सरकारने स्वीकारलेला ‘सब का साथ सब का विकास’ हा मंत्र शाहूंच्या विचारातील आहे. राज्य सरकारने सुरू केलेली जलयुक्त शिवार योजना शाहूंच्या शेतीविषयक कामावर आधारलेली आहे. आम्हाला सत्तेचा लोभ नाही. सिंहासनाची आस नाही. शिवाजी, शाहू यांच्या विचारांच्या पथदर्शक मार्गावरून विकास करून दाखविण्याची आस आहे. शाहू महाराज कोणा एका जातीचे, वर्गाचे नव्हते, ही गोष्ट या ग्रंथाच्या माध्यमातून समोर आली आहे. गौरवग्रंथात तौलनिक लेखाजोखा मांडला गेला असून, खरा इतिहास समोर आणण्याचा प्रयत्न रमेश जाधव यांनी केला, असे उद्गार शिक्षणमंत्री तावडे यांनी यावेळी काढले. सरकार कोणाचे का असेना; पण शाहू विचारांचे कार्य पुढे नेण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांचे सरकार करीत आहे, असा गौरवपूर्ण उल्लेख श्रीमंत शाहू छत्रपती यांनी यावेळी केला. याप्रसंगी आमदार सुरेश हाळवणकर, अमल महाडिक, उल्हास पाटील, आदी उपस्थित होते. प्रा. रमेश जाधव यांनी प्रास्ताविक केले. पंधरा वर्षांत काम रखडले गेल्या पंधरा वर्षांत शाहू, फुले, आंबेडकर यांच्या जीवनावरील ग्रंथांचे काम रखडले होते. दररोज एक पान लिहिले गेले असते तरी हे ग्रंथ पूर्ण झाले असते. उठता-बसता त्यांची नावे घेतली आणि त्याचवेळी प्रेरणा देणारा वारसा नवा पिढीसमोर मांडण्याची जबाबदारी असताना ग्रंथाचे काम रखडून ठेवले गेले. मात्र, आमचे सरकार सत्तेवर आल्याबरोबर या तीन व्यक्तींच्या ग्रंथांचे काम अग्रक्रमाने हाती घेतले. चांगले काम चांगल्या माणसांच्या हातूनच व्हावे, अशीच सर्वांची इच्छा असल्याने काम रेंगाळले असावे, असे तावडे म्हणाले.
गुंतवणुकीशिवाय शेतीत फायदा अशक्य - फडणवीस
By admin | Published: June 27, 2016 1:04 AM