Women's Day 2018 कोल्हापूर : महिला रॅलीतून ‘स्त्रीशक्तीचा जागर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 06:06 PM2018-03-08T18:06:46+5:302018-03-08T18:06:46+5:30

डॉ. डी. वाय. पाटील ग्रुप व सतेज ऊर्फ बंटी पाटील फौंडेशन आणि प्रतिमा सतेज पाटील सोशल वेल्फेअरतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त गुरुवारी सकाळी ‘वॉक फॉर प्रोग्रेस’ ही महिलांसाठी गांधी मैदान ते बिंदू चौक अशी रॅली आयोजित केली होती. यात कर्तृत्वाचे पंख लेऊन विविध क्षेत्रांत पुरुषांच्या बरोबरीने आघाडी घेणाऱ्या महिलांनी एकजुटीसह करवीरकरांना भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले.

Women's Day 2018 Kolhapur: Women's Rally 'Women's Strength Jagar' | Women's Day 2018 कोल्हापूर : महिला रॅलीतून ‘स्त्रीशक्तीचा जागर’

Women's Day 2018 कोल्हापूर : महिला रॅलीतून ‘स्त्रीशक्तीचा जागर’

googlenewsNext
ठळक मुद्देकोल्हापूर : महिला रॅलीतून ‘स्त्रीशक्तीचा जागर’, गांधी मैदान ते बिंदू चौक ‘वॉक फॉर प्रोग्रेस’ रॅलीडॉ. डी. वाय.पाटील ग्रुप,  सतेज ऊर्फ बंटी पाटील फौंडेशन व प्रतिमा सतेज सोशल वेल्फेअरतर्फे आयोजन

कोल्हापूर : डॉ. डी. वाय. पाटील ग्रुप व सतेज ऊर्फ बंटी पाटील फौंडेशन आणि प्रतिमा सतेज पाटील सोशल वेल्फेअरतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त गुरुवारी सकाळी ‘वॉक फॉर प्रोग्रेस’ ही महिलांसाठी गांधी मैदान ते बिंदू चौक अशी रॅली आयोजित केली होती. यात कर्तृत्वाचे पंख लेऊन विविध क्षेत्रांत पुरुषांच्या बरोबरीने आघाडी घेणाऱ्या महिलांनी एकजुटीसह करवीरकरांना भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले.

गांधी मैदान येथे सकाळी आठ वाजता महापौर स्वाती यवलुजे, आमदार सतेज पाटील, संयोगिताराजे, रूपाली नांगरे-पाटील, माजी खासदार निवेदिता माने, रोहिणी अविनाश सुभेदार, डॉ. अनुश्री अभिजित चौधरी, प्रकृती निगम-खेमनार, राजलक्ष्मी चंद्रदीप नरके, स्मितादेवी जाधव, राजश्री काकडे, शिल्पा नरके, समरीन मुश्रीफ, नबीरा मुश्रीफ, महापालिकेच्या महिला कल्याण सभापती वनिता देठे, माजी महापौर सई खराडे, हसिना फरास, अश्विनी रामाणे, वंदना बुचडे, वैशाली डकरे, आदींच्या उपस्थितीत हवेत फुगे सोडून या रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. प्रतिमा पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

गांधी मैदान ते बिंदू चौक असे या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ‘ऊठ माणसा जागा हो, स्त्री-पुरुष समानतेचा धागा हो,’ ‘मुलगी वाचवा,’ ‘स्त्री-पुरुष समानता, सूर्य-चंद्र, प्रकाश सावली मग दुजाभाव का,’ ‘महिलांची छेडछाड प्रतिबंधक कायदा कडक करा, मिरची पावडर वापरून आपला बचाव करा,’ ‘हेल्मेट वापरा, जीवन वाचवा,’ ‘इंग्रजी शाळा करा हद्दपार, उघडा मराठी शाळेचे दार,’ ‘राज्यघटना, संविधान वाचवा,’ ‘ज्ञानाधीनम जगत् सर्वम्’ असे संदेश घेऊन महिला सहभागी झाल्या होत्या. हे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.


सकाळी साडेसात वाजल्यापासून गांधी मैदान परिसर महिलांच्या गर्दीमुळे फुलून गेला होता. यामध्ये एकाच रंगाच्या साड्या, फेटे परिधान करून महिला सहभागी झाल्या होत्या. झाडे आणि वन्यप्राण्यांची वेशभूषा परिधान करून काही महिला यामध्ये सहभागी झाल्या होत्या.

विशेष म्हणजे अनेक महिलांनी बुलेटवर स्वार होऊन रॅलीत सहभागी होणे पसंत केले होते. काहींनी रथात बसून राजर्षी शाहू महाराजांची वेशभूषा केली होती.  गार्डन क्लबच्या महिलांनी सूर्य, चंद्र, धरती, वर्षा, जीव, इंद्रधनुष्य, तारे अशी वेशभूषा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या रॅलीत प्रबोधनात्मक देखावे, कथ्थक, भरतनाट्यम्, योगा, पारितोषिक विजेत्या महिला खेळाडू, खुल्या जीपमध्ये उभ्या होत्या.

अवनि, एकटी, लवंगी मिरची कोल्हापूरची ग्रुप, गार्डन क्लब, सीमंतिनी मराठा महिला, करवीर भगिनी मंडळ, बिझनेस वूमन क्लब, मोहनी पैठणी गु्रप, वैभवी जरग फौंडेशन, प्रिन्सेस इंदुमतीदेवी गर्ल्स हायस्कूल, पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, नेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, शीलादेवी शिंदे हायस्कूल, कोल्हापूर हायस्कूल, जैन युवती मंडळ, व्हाईट आर्मी, स्वामिनी बहुउद्देशीय महिला संस्था, आदी संस्था व शाळाही सहभागी झाल्या होत्या.

महापौरांसह नगरसेविकांचीही हजेरी

नगरसेविका सुरेखा शहा, शोभा कवाळे, सूरमंजिरी लाटकर, जयश्री चव्हाण, निलोफर आजरेकर, वृषाली कदम, शमा मुल्ला, शोभा बोंद्रे, उमा बनछोडे, माधुरी लाड, ऋग्वेदा माने, माधवी गवंडी, आदी सहभागी झाल्या.

 

 

Web Title: Women's Day 2018 Kolhapur: Women's Rally 'Women's Strength Jagar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.