प्रदीप शिंदे
कोल्हापूर : राज्य परिवहन महामंडळाने आता महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिला प्रवाशांसाठी स्वतंत्र एस. टी. बस सुरू करून अनोखी भेट दिली आहे. कोल्हापूर ते सांगली अशी फक्त महिला प्रवाशांसाठी असलेली ही विशेष बस ८ मार्चपासून धावणार आहे.आजच्या काळात स्त्रीची भूमिका बदलली आहे. ती मुलगी, सून, पत्नी, माता या भूमिकांव्यतिरिक्त अधिकारी, वैज्ञानिक, शिक्षक, कर्मचारी, मालक अशा अनेक रूपांनी वावरते. आपल्या बुद्धीला, आत्मसन्मानाला तिने नवीन दिशा दिली आहे. आजच्या जगात ती प्रत्येक क्षेत्रात पुरुषांसोबत आहे.
अनेक महिला आज कामानिमित्त कोल्हापूर ते सांगली व सांगली ते कोल्हापूर असा दैनंदिन प्रवास करतात. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या जास्त आहे. मुंबईतील महिलांसाठी असलेल्या लोकल ट्रेनप्रमाणेच महिला प्रवाशांसाठी कोल्हापूर व सांगली विभागांच्या वतीने ‘लेडीज स्पेशल’ विशेष एस. टी. बससेवा सुरू करण्यात येत आहे.दैनंदिन संसाराचा गाडा सुरळीत चालण्यासाठी घर, संसार, मुलांबाळाचे संगोपन करून दररोज कामानिमित्त जाताना एस. टी.मधून प्रवास करताना महिलांना जागा न मिळणे, गाडीतील गर्दी यासारख्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. सकाळी दहा व सायंकाळी सहा वाजता प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन, खास महिलांसाठीच या विशेष गाडीचे नियोजन करण्यात आले आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने सामाजिक बांधीलकी जपत परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या मार्गदर्शनाखाली ‘महिला दिना’चे औचित्य साधून कोल्हापूर व सांगली विभागाच्या वतीने ‘फक्त महिलांसाठी’च या गाड्या सुरू करण्यात येत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील हा पहिलाच उपक्रम आहे.शैलेंद्र चव्हाण,विभाग नियंत्रक
- - कोल्हापूर व सांगली विभागांतर्फे नियोजन
- - सकाळी व सायंकाळी दोन सत्रांत
- - महिलांची गैरसोय टळणार.
महिलाच वाहक‘लेडीज स्पेशल’ एस.टी. बसमध्ये वाहक म्हणून महिला कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहे. त्यामुळे महिलांना कोणत्याही गैरसोईला सामोरे जावे लागणार नाही. तसेच महिला प्रवाशांच्या मागणीनुसार अन्य काही मार्गांवरही गाड्या सोडण्यात येणार आहेत.
यावेळी सुटणार गाडी
- कोल्हापूर बसस्थानक : सांगलीकडे सकाळी ९.१५ वा. व सायंकाळी ५.४५ वा.
- सांगली बसस्थानक : कोल्हापूरकडे सकाळी ९.१५ वा. व सायंकाळी ५.४५ वा.