कोल्हापुरला जोडणाऱ्या घाटरस्त्यांचे काम दोन महिन्यात मार्गी : रविंद्र चव्हाण
By संदीप आडनाईक | Published: February 8, 2024 09:31 PM2024-02-08T21:31:57+5:302024-02-08T21:32:25+5:30
कोल्हापूर विश्रामगृहाचे नूतणीकरण : साकवाऐवजी पूलासाठी १३०० कोटींची तरतूद करणार
कोल्हापूर: कोकण आणि कोल्हापूरला जोडणाऱ्या घाटरस्त्यांच्या कामांमध्ये येणाऱ्या अडचणी येत्या दोन महिन्यात मार्गी लागून या रस्त्यांच्या कामाला सुरुवात होईल असे सांगून सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी राज्यातील साकवाच्या जागी पूलनिर्मितीसाठी १३०० कोटी रुपयांचा निधी अंदाजपत्रकात घेउन या साकवाच्या प्रश्नाला कायमचा पूर्णविराम देणार आहे, असे जाहीर केले.
कोल्हापूर जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध विकास कामांचा आभासी पध्दतीने लोकार्पण आणि कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहाच्या नूतनीकरणाचा प्रारंभ गुरुवारी मंत्री चव्हाण आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते फित कापून झाला. यावेळी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणेचे उपाध्यक्ष आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी विविध विकास कामांची चित्रफीत दाखवण्यात आली.
मंंत्री चव्हाण म्हणाले,अनेक वर्षापासून कोकणाला जोडणाऱ्या घाटरस्त्याचे प्रलंबित कामे मार्गी लागणार आहेत. वनखाते आणि बांधकाम खाते यांच्यात बैठक झाली असून येत्या दोन महिन्यात या कामांना प्रारंभ होणार आहे, दोन्ही बाजूंच्या अडचणी दूर करण्यात येतील. जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने मोजणीसाठी पैसे भरण्यात आले असून हे काम अंतिम टप्य्यात असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. कोकणातील साकव दुरुस्तीचा प्रलंबित प्रश्न अधिवेशनात मंजूर केला. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासाठी १३०० कोटी रुपयांची तरतूद करुन हा प्रश्न निकाली काढला जाईल. पूर्वी साकवासाठी ३५ लाख रुपये दिले जात, आता त्यासाठी १ कोटी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
भाजपचे राजवर्धन निंबाळकर यांनी प्रास्तविक केले. माजी आमदार अमल महाडिक यांनी अंबाबाईची प्रतिमा देउन चव्हाण यांचे स्वागत केले. आमदार प्रकाश आबिटकर यांनी शिवडाव घाट तसेच जिल्ह्यातील आणखी रस्ते कामाच्या उद्घाटनासाठी मंत्री चव्हाण पुन्हा येतील असे ठामपणे सांगितले.
महाडिक यांनी विमानतळ जोडरस्ता, केर्ली ते पंचगंगा पूल रस्ता दुरुस्ती, रिंगरोड जोडणे, शिये ते बावडा रस्त्याची उंची वाढवणे या कामांची मागणी केली. अधीक्षक अभियंता शामराव कुंभार यांनी विविध विकास कामांची माहिती दिली. कार्यकारी अभियंता संजय पाटील, विशेष प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत आयरेकर यांनी स्वागत केले. दक्षिणचे कार्यकारी अभियंता प्रविण जाधव यांनी आभार मानले. यावेळी राहुल चिकोडे, विजय देसाई, राहुल देसाई, सत्यजित कदम, महेश जाधव उपस्थित होते.