जागतिक जल दिवस विशेष: नैसर्गिक पाणीसाठा कमी झाल्याने वन्यजीवांच्या अस्तित्वाचा प्रश्न
By संदीप आडनाईक | Published: March 22, 2024 03:49 PM2024-03-22T15:49:21+5:302024-03-22T15:50:30+5:30
खासगी संस्थेची मदत घेण्याची गरज..
संदीप आडनाईक
कोल्हापूर : जंगलतोड, खाणकाम, पीक पद्धतीतील मोठे बदल, दुष्काळ, सर्वसाधारणपणे कोरडे पडणे, पाण्याच्या गुणवत्तेचा ऱ्हास, भूजल शोषून घेणे या सर्व प्रक्रियांचा वन्यजीव क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. जंगलातील पाण्याचे स्रोत आटल्याने पश्चिम घाटातील काही ठिकाणी वन्यजीवांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी खासगी स्वयंसेवी संस्थेची मदत घेतल्यास उन्हाळ्यात वन्यजीवांसाठी तहान भागण्यास मदत होणार आहे.
पश्चिम घाटातील राधानगरी, भुदरगड, शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा, आजरा, चंदगड या तालुक्यांत घनदाट जंगल आहे. वन्यजीवांच्या अस्तित्वाच्या खुणा जंगल परिसरात आहेत. अशा वन्यजीवांच्या संवर्धनाचा भाग म्हणून वन विभागातर्फे जंगली भागात कृत्रिम वनतळी तयार केली जातात. कोल्हापूर वन्यजीव क्षेत्रात चार तलाव, तळी आहेत. नैसर्गिक पाण्याचे जवळपास ५० स्रोत आहेत. बारमाही ३६ आणि हंगामी १७ तळी आहेत. बारमाही १९ आणि हंगामी ८ अशी कृत्रिम वनतळी तयार केलेली आहेत. याशिवाय मोठे ५४ नाले या क्षेत्रात वाहतात.
वन विभागाने पूर्वी जंगलातील वनतळी पुनरुज्जीवित करण्यास प्राधान्य दिले आहे. वास्तविक गेल्या काही वर्षांत पश्चिम घाटात साडेतीनशेहून अधिक वनतळी (पाणवठे) बांधली आहेत. त्यांपैकी निम्म्याहून अधिक तळ्यांतील पाण्याची पातळी कायम आहे; मात्र आता निम्मी तळी कोरडी पडली असून त्यांची स्वच्छता करून पुन्हा पाणवठे तयार करण्याचे आव्हान आहे. ज्या वनतळ्यांत सध्या पाणीसाठा आहे, आणि पावसाळ्याचे पाणी डिसेंबरअखेरपर्यंत टिकून राहते, तेथे उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर पाणी पूर्णतः संपून जाते. अशा वनतळ्यांत सभोवतालच्या झाडांचा पालापाचोळा पडतो. त्यामुळे तळी बुजून जातात. या तळ्यांची साफसफाई करून ते पुन्हा पाणी साठवणुकीसाठी तयार करणे गरजेचे आहे.
लहान प्राण्यांना फटका
धरणालगतच्या पाणवठ्यावर मोठे वन्यजीव येतात; मात्र भयामुळे लहान प्राणी तिथे जात नाहीत. जंगलातील तळ्यांचे पाणी आटून गेल्याने त्यांना तिथेही पाणी मिळत नाही. ओलवण, देवर्डे, वाकीघोल, जांबरे, साळवण अशा भागांत वन्यजीव दिसतात, पाणी कमी झाल्याचा पहिला फटका वानरांना बसताे आणि ती रस्त्याकडेला येतात.