कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सावाच्या शुक्रवारी कोल्हापुरातील श्री अंबाबाईची मोहिनी देवीच्या रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. देव आणि दैत्यांनी केलेल्या समुद्र मंथनातून दुर्लभ अशी १४ रत्ने प्रगट झाली. यामध्ये धन्वंतरी अमृत कलश हातात घेऊन प्रकट झाले. हा अमृत कलश दैत्य बळजबरीने काढून घेऊ लागले. या अमृत प्राशनाने अधार्मिक, अन्यायी, क्रूर राक्षस अमर होतील व सर्वांना त्रासदायक होतील अशी देवगणांना चिंता वाटू लागली. सर्व देवता श्री विष्णूंना शरण गेले.भगवानऽपि योगिंद्र; समाराध्य महेश्वरीम् । तदेकध्यानयोगेन तद्रूप: समजायत । यावेळी भगवान विष्णूने आत्म्यैकरूपा श्रीललिता देवीची आराधना करून, ध्यानयोगाने श्रीमातेचे रूप प्रगट केले. तोच 'हा मोहिनी अवतार'.. आपल्या अपार शक्तीने अखेर तो अमृत कलश श्रीदेवीमातेने घेतला व देवांना अमृत व दैत्यांना मदिरा पुरवली. त्यामुळे दैत्यांचा पराभव झाला. त्रिभुवनाला मोहित करणारी, शृंगारनायिका, सर्व आभूषणांनी व शृंगार वेषांनीयुक्त, सज्जनांचे रक्षण व दुर्जनांचा नाश करणारी अशा मोहिनी स्वरूपाचे दर्शन घडवणारी ही पूजा श्रीपूजक सचिन ठाणेकर, प्रसाद लाटकर, श्रीनिवास जोशी यांनी बांधली.
Navratri 2023: सहाव्या माळेला कोल्हापूरच्या अंबाबाईचे मोहिनी अवतारात पूजन
By इंदुमती सूर्यवंशी | Published: October 20, 2023 4:50 PM