कोल्हापूर- स्वर्गीय लोकनेते खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या ८३ व्या स्मृतीदिनानिमित्त रविवारी (दि. २६) ला राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदान येथे प्रदीर्घ कालावधीनंतर लाल मातीतील कुस्त्यांचे मैदान होणार आहे. यात ऑलिम्पिकवीर, ट्रिपल महाराष्ट्र केसरी नरसिंग यादव विरुद्ध हिंदकेसरी सुमित मलिक, पंजाब केसरी सोनु कुमार पंजाबी विरुद्ध हरियाणा केसरी प्रदीप चिक्का या प्रमुख लढतींसह अन्य दिग्गज कुस्तीगीरांच्या २३० विक्रमी प्रेक्षणिय कुस्त्या रसिकांना पाहता येणार आहेत, अशी माहिती फाऊंडेशनचे अॅड. विरेंद्र मंडलिक यांनी बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
गेल्या अनेक वर्षात खासबागमध्ये कुस्तीचे मैदान झालेले नाही. कुस्ती ही खऱ्या अर्थाने कोल्हापूरची शान आहे. त्या दृष्टीने कोल्हापूरच्या कुस्ती शौकीनांना लाल मातीतील कुस्ती पाहता यावी. यासह कुस्तीला नवसंजीवनी मिळावी. याकरीता सदाशिवराव मंडलिक इरिगेशन,अॅग्रीकल्चरल, एज्युकेशनल अॅन्ड कल्चरल रिसर्च फाऊंडेशनतर्फे देशातील आघाडीच्या मल्लांमध्ये मल्ल युद्धाचे आयोजन केले आहे. यापुर्वी स्वर्गीय मंडलिक यांच्या वाढदिवसानिमित्त २००३ ते २००८ दरम्यान जंगी कुस्त्यांचे मैदान याच मैदानावर भरविण्यात आले होते. ही कुस्तीची खंडीत परंपरा पुन्हा एकदा या स्पर्धेनिमित्त सुरु केली जाणार आहे.
रविवारी होणाऱ्या कुस्तींमध्ये ऑलिम्पिकवीर व ट्रीपल महाराष्ट्र केसरी नरसिंग यादव विरुद्ध हिंदकेसरी व भारतकेसरी सुमित मलिक , पंजाबकेसरी सोनुकुमार विरुद्ध हरियाणा केसरी प्रदीप चिक्का यांच्यात मुख्य लढत होणार आहे. यासह भारतकेसरी परवेश कुमार (दिल्ली) विरुद्ध गंगावेश तालीमच्या माऊल जमदाडे , भारत केसरी (हरियाणा) चा परविन भोला विरुद्ध मोतीबागचा विजय धुमाळ, महान भारत केसरी योगेश बोंबाळे विरुद्ध अतुल पाटील (परभणी), उपमहाराष्ट्र केसरी नंदु आबदार विरुद्ध गणेश जगताप (आंतरराष्ट्रीय विजेता , पुणे) , संतोष दारवाड (शाहूपुरी) विरुद्ध साईनाथ रानवडे (मामासाहेब मोहळ, पुणे), समीर देसाई विरुद्ध अनुपकुमार, कौतुक डाफळे विरपुद्ध कार्तिक काटे (कर्नाटक केसरी ), देवीदास घोडसके विरुद्ध विजय पाटील (मोतीबाग), सचिन जामदार ( गंगावेश) विरुद्ध विवेक कुमार ( सतपाल आखाडा, दिल्ली), शिवाया पुजारी विरुद्ध संतोष लवटे ( मोतीबाग) यांच्यासह २३० कुस्ती कार्यक्रम प्रेक्षकांना पाहता येणार आहेत.