Kolhapur: कुस्तीचे भीष्माचार्य बाळ गायकवाड यांचे निधन
By भारत चव्हाण | Published: February 6, 2024 01:28 PM2024-02-06T13:28:17+5:302024-02-06T13:29:45+5:30
कोल्हापूर : महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेेत्रातील मार्गदर्शक बाळ राजाराम गायकवाड (वय ९२) यांचे मंगळवारी सकाळी येथील खासगी रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन ...
कोल्हापूर : महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेेत्रातील मार्गदर्शक बाळ राजाराम गायकवाड (वय ९२) यांचे मंगळवारी सकाळी येथील खासगी रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झाले. देशभरात दबदबा निर्माण केलेल्या उत्तरेतील पहिलवानांचा कर्दनकाळ ठरलेल्या कुस्ती सम्राट युवराज पाटील यांचे बाळ गायकवाड हे गुरू होत. अनेक जिगरबाज पहिलवानांना घडविणाऱ्या बाळ गायकवाड यांना कुस्तीचे भीष्माचार्य म्हणून ओळखले जात होते. पन्हाळा तालुक्यातील पुनाळ येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
बाळ गायकवाड यांना ऐन तारुण्यात कुस्तीची आवड निर्माण झाली. त्यांनी कुस्ती खेळली खरी परंतु फारशी मैदाने केली नाहीत. परंतु कुस्ती कलेवरील प्रेमापोटी त्यांनी या क्षेत्राला वाहून घेतले. कुस्तीचे डावपेच, मैदानाच्या तयारीसाठी करावी लागणारी मेहनत, पहिलवानांचा आहार, विश्रांती याचे बारकावे समजावून घेतले. स्वत: घेतलेल्या कुस्तीतील ज्ञानाचा उपयोग त्यांनी नव्या दमाच्या पहिलवानांना देण्यासाठी केला.
गेली सत्तर वर्षे त्यांनी कुस्ती क्षेत्रासाठी एक मार्गदर्शक म्हणून भूमिका पार पाडली. कुस्ती क्षेत्रात योगदान देता यावे म्हणून त्यांनी घरदार सोडून सर्वस्वाचा त्याग करत तालमीत वास्तव्य केले. अविवाहित राहून संन्यासी जीवन जगले. एवढेच नाही तर खरी कॉर्नरजवळील स्वत:च्या मालकीच्या जागेत कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाची इमारत उभी करून कुस्ती कलेचा प्रसार व प्रोत्साहन देण्याचे कार्य सुरू केले.
माजी कृषी मंत्री स्वर्गीय श्रीपतराव बोंद्रे, स्वर्गीय बाळासाहेब देसाई, स्वर्गीय महिपतराव बोंद्रे यांच्या सहकार्याने बाळ गायकवाड यांनी कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाची स्थापना केली. पुढे हेच तालीम संघाचे कार्यालय, तसेच मोतीबाग तालीम बाळ गायकवाड यांची कर्मभूमी बनली. अतिशय कडक शिस्तीच्या बाळ यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य कुस्तीच्या वाढीसाठी खर्ची घातले. तालीम संघाच्या कार्यालयात राहून त्यांनी पहिलवान घडविण्याचे कार्य सुरू केले. दादू चौगुले, चंबा मुत्नाळ, युवराज पाटील, लक्ष्मण वडार, विनोद चौगुले, विष्णू जोशीलकर यांच्यासह असंख्य पहिलवानांना घडविण्यात बाळ गायकवाड यांनी योगदान दिले. तालीम संघाचे जनरल सेक्रेटरी, चिफ पेट्रन अशा जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या.
‘पुरस्कारासाठी नाही, कुस्तीसाठी झटतोय’
कुस्ती क्षेत्रातील बाळ गायकवाड यांचे योगदान लक्षात घेऊन तत्कालीन खासदार स्वर्गीय उदयसिंगराव गायकवाड, खासदार स्वर्गीय बाळासाहेब माने यांनी महाराष्ट्र शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या द्रोणाचार्य पुरस्कारासाठी शिफारस केली होती. ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनीही तशी विनंती केली होती. ‘मी पुरस्कारासाठी नाही तर कुस्तीसाठी झटतोय’ असे सांगून बाळ गायकवाड यांनी ती नम्रपणे नाकारली होती.