कोल्हापूर : आपटेनगर येथील यशवंत सहकारी बँकेतील गुरुवारी (दि. ३0) झालेला लुटण्याचा प्रकार हा माहीतगार अथवा टिप देऊनच झाला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे; त्यामुळे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांसह बँकेच्या कर्मचाऱ्यांकडेही कसून चौकशी पोलीस करीत आहेत.फुलेवाडी रिंगरोडवरील आपटेनगर येथे असलेली बॅँकेची ही शाखा निर्जन ठिकाणी आहे. दुपारच्या या भागात रस्त्यावर शुकशुकाट असतो. विशेषत: परिसरातील रहिवाशी दुपारी विश्रांती घेत असल्याने प्रत्येकाच्या घरचा दरवाजा बंद असतो. याचा अंदाज घेऊन चोरट्यांनी पाळत ठेवून ही बॅँक लुटल्याचे बोलले जात आहे. गुरुवारी (दि. ३०) दुपारी लिपिक दर्शन दिलीप निगडे हे एकटेच असताना चोरट्यांनी पिस्तूलचा धाक दाखवून ६२ हजार रुपयांची चोरी केली.
डोक्याला हेल्मेट व तोंडाला स्कार्फ बांधून आलेले हे चोरटे सराईत नाहीत. बॅँकेतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांचा हावभाव पाहिला तर नवख्यांनीच ही चोरी केल्याचे दिसते. तरीही सर्व शक्यता गृहीत धरून पोलीस तपास करीत आहेत. शहरातील सराईत गुन्हेगारांना पोलीस ठाण्यात आणून त्यांच्याकडे चौकशी केली जात आहे. यासह आपटेनगर, रिंगरोडवरील सर्व घरांतील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. बॅँकेत घुसलेल्या चोरट्यांनी केलेल्या पोषाखावरून या परिसरातील दुचाकीस्वारांच्या गाडीचा नंबर शोधला जात आहे.करवीर विभागाचे पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, करवीरचे साहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळे यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथकही सामूहिकपणे हा तपास करीत आहेत. बॅँकेचे कर्मचारी, शाखाधिकारी यांच्याकडेही चौकशी केली जात आहे. सराईत गुन्हेगारांनी टीप देऊन या बॅँकेवर दरोडा टाकण्याचा कट रचला असावा, असा अंदाज पोलिसांनी बांधला आहे; त्यामुळे सराईतांकडेही चौकशी सुरू केली आहे; त्यामुळे बॅँकेचे कर्मचारी व शहरातील सराईत गुन्हेगार याची पोलीस चौकशी करीत आहेत.शहरातील अनेक ठिकाणचे फुटेज घेतले जात आहेत. संशयितांचा शोध घेण्यासाठी सांगली, सातारा व कर्नाटकात पोलीस पथके रवाना झाली आहेत. या धाडसी चोरीची पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. लुटीचा छडा लवकर लागावा, याकरिता स्थानिक गुन्हे अन्वेषणसह करवीर पोलिसांना कसून तपास करण्याच्या सूचना केल्या आहेत.