केंद्राच्या दडपणामुळेच येडियुराप्पांचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:26 AM2021-07-28T04:26:52+5:302021-07-28T04:26:52+5:30
संकेश्वर : माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा हे अत्यंत भ्रष्ट व खोटे बोलण्यात तरबेज आहेत. त्यांच्यावर दडपण आणूनच केंद्रीय नेतृत्वाने त्यांचा ...
संकेश्वर : माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा हे अत्यंत भ्रष्ट व खोटे बोलण्यात तरबेज आहेत. त्यांच्यावर दडपण आणूनच केंद्रीय नेतृत्वाने त्यांचा राजीनामा घेतला आहे, अशी टीका कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. सिद्धरामय्या यांनी केली. पूरपरिस्थितीच्या पाहणीसाठी ते संकेश्वर दौऱ्यावर आले होते. येथील नदीवेस परिसरातील पूरस्थितीच्या पाहणीनंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
कर्नाटकातील राजकीय घडामोडींकडे काँग्रेसचे लक्ष आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. सिद्धरामय्या म्हणाले, पूरग्रस्तांना मदत करण्याऐवजी कर्नाटकातील भाजप नेते सत्तेच्या साठमारीत दंग आहेत. त्यांना जनतेच्या जीवन-मरणाशी काही देणे-घेणे नाही. अलीकडे वारंवार महापूर येत आहे. त्यामुळे सरकारने सुरक्षित जागेत पक्की घरे बांधून पूरग्रस्तांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याची गरज आहे. यावेळी माजी मंत्री ए. बी. पाटील, आमदार सतीश जारकीहोळी, काकासाहेब पाटील, अंजली निंबाळकर, लक्ष्मी हेब्बाळकर, महादेव पट्टण, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
---
केंद्राची कर्नाटकला सापत्न वागणूक
केंद्र सरकार कर्नाटकला दुजाभावाची वागणूक देत आहे. पंतप्रधान मोदींनी कर्नाटकचा एकही दौरा केलेला नाही. तसेच कर्नाटक सरकारला कोणत्याही प्रकारची आर्थिक मदतदेखील केलेली नाही, असा आरोपही सिद्धारामय्या यांनी यावेळा केला. ------------------
फोटो ओळी : संकेश्वर (जि. बेळगाव) येथे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधला. यावेळी ए. बी. पाटील, काकासाहेब पाटील, सतीश जारकीहोळी, अंजली निंबाळकर उपस्थित होते. क्रमांक : २७०७२०२१-गड-११