गडहिंग्लजच्या युवकाचा शिरोडा समुद्रात बुडून मृत्यू
By admin | Published: September 28, 2014 12:50 AM2014-09-28T00:50:47+5:302014-09-28T00:51:00+5:30
सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचा
शिरोडा (गोवा) : गडहिंग्लज येथून सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचा शिरोडा येथील समुद्रात बुडाल्याने मृत्यू झाला. ही घटना आज, शनिवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. राजेंद्र चंद्रकांत डबडे (वय १८, रा. कडगाव, गडहिंग्लज) असे या युवकाचे नाव आहे.
गडहिंग्लज येथील शिवराज महाविद्यालयातील प्रथम वर्ष विज्ञान या वर्गाची सहल आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास शिरोडा वेळागर येथे आली होती. या सहलीला नव्वद विद्यार्थ्यांसह पाच शिक्षक आले होते.
दुपारी जेवण आटोपल्यानंतर साडेतीन वाजता काही विद्यार्थी समुद्रात मौजमजेसाठी उतरले होते. मात्र, समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने यातील राजेंद्र डबडे हा युवक समुद्रात गटांगळ्या खाऊ लागल्याने सोबतच्या विद्यार्थ्यांनी आरडाओरडा केल्यानंतर शिक्षकांसह अन्य विद्यार्थ्यांनी त्याला बाहेर काढले. मात्र, तो बेशुद्धावस्थेत होता. स्थानिकांच्या मदतीने त्याला शिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
या घटनेची माहिती युवकाच्या घरी देण्यात आली आहे. घटनेचा अधिक तपास शिरोडा पोलीस करीत आहेत. (वार्ताहर)