कोल्हापूर : दहा दिवसांपूर्वी ताराबाई पार्कमध्ये किरकोळ कारणावरुन लाकडी दांडक्याने केलेल्या प्राणघातक हल्ल्यातील गंभीर जखमी तरुणाचा मृत्यू झाला. वेद प्रकाश खानोलकर (वय २७, रा. जोतिर्लिंग कॉलनी, जगताप नगर, पाचगाव रोड, कोल्हापूर) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी बुधवारी याप्रकरणी तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. या गुन्ह्यात संशयितांनी वापरलेली मोटारही पोलिसांनी जप्त केली आहे.
या हल्ल्याप्रकरणी धनराज उर्फ माॅंटी प्रकाश व्हटकर (वय ३२, रा. अयोध्या टॉवर, दाभोळकर चौकनजीक), ओंकार रवींद्र आवळे (२०), रोहित राहुल भिंगारे (२१, दोघेही रा. कनाननगर) या संशयितांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वेद खानोलकर हा ताराराणी चौकातील मोटारीच्या शोरुममध्ये सेल्समन म्हणून नोकरीला होता. सायंकाळी नोकरीवरुन सुटल्यानंतर वेद हा ताराबाई पार्कमधील बीएसएनएल कार्यालयाशेजारी मित्रांसोबत काहीकाळ गप्पा मारत थांबत असे. त्यातून वेद व संशयित धनराज व्हटकर यांची तोंडओळख होती. दिनांक ७ मार्च रोजी रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास वेद आणि धनराज यांच्यात एकमेकांकडे पाहण्यावरुन वाद झाला. धनराज व्हटकर, ओंकार आवळे, रोहित भिंगारे या तिघांनी वेद खानोलकर याला लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. यात वेदच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर वेद यानेच मारहाणीची माहिती वडील प्रकाश खानोलकर यांना मोबाईलवरुन दिली. तेही बाहेरगावाहून तातडीने रुग्णालयात आले. त्यावेळी वेद हा बेशुद्धावस्थेत होता.
दुसऱ्या दिवशी प्रकाश खानोलकर यांनी शाहुपूरी पोलीस ठाण्यात धनराज व्हटकर याच्यासह तिघांविरोधात तक्रार दिल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. वेद याची प्रकृती बिघडल्याने उपचार सुरु असताना रुग़्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे शाहुपूरी पोलीस ठाण्यात तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी संशयितांची शोध मोहीम राबवून धनराज व्हटकर, ओंकार आवळे, रोहित भिंगारे यांना अटक केली आहे. दरम्यान, संशयितांनी गुन्ह्यात वारपलेली मोटार पोलिसांनी जप्त केली आहे. मृत वेद हा अविवाहित होता, त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.
व्हटकरची गुन्हेगारी पार्श्वभूमी
संशयित धनराज व्हटकर याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, त्याच्यावर यापूर्वी एप्रिल २०१६मध्ये सासने मैदान येथे युवकाला बेदम मारहाण केल्याचा गुन्हा शाहुपूरी पोलिसात दाखल आहे.
संशयितांनीच जखमीला रुग्णालयात केले दाखल
वेद खानोलकर याला रक्तबंबाळ अवस्थेत संशयितांनीच आपल्या मोटारीतून राजारामपुरीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याला दाखल केल्यानंतर तिघा संशयितांनी रुग्णालय प्रशासनाला कोणतीही माहिती न देता, तेथून मोटारीसह पळ काढल्याची माहिती वेद याचे वडील प्रकाश खानोलकर यांनी पोलिसांना दिली.
हल्ल्याचे कारण गुलदस्त्यात
या खूनप्रकरणी तिघा संशयिताांना अटक केली असली, तरीही वेद याच्यावर हल्ला कोणत्या कारणांनी झाला, याची माहिती सायंकाळी उशिरापर्यंत मिळविण्यात पोलिसांना यश आले नव्हते. त्यामुळे हल्ल्याचे कारण पोलिसांनी गुलदस्त्यातच ठेवल्याची चर्चा होती.
फोटो नं. १७०३२०२१-कोल - वेद खानोलकर (डेथ)
फोटो नं. १७०३२०२१-कोल- मोटर कार
ओळ : हल्ल्यावेळी संशयितांनी गुन्ह्यात वापरलेली मोटार कार शाहुपूरी पोलिसांनी जप्त केली.