कास पठार रस्त्यावर दोनशे फूट दरीत कार कोसळून तरुणी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 05:03 AM2020-12-05T05:03:12+5:302020-12-05T05:03:12+5:30
सातारा : कास यवतेश्वर रस्त्यावरील गणेशखिंड घाटातून कार शंभर फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात २५ वर्षीय तरुणी ...
सातारा : कास यवतेश्वर रस्त्यावरील गणेशखिंड घाटातून कार शंभर फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात २५ वर्षीय तरुणी जागीच ठार झाली. या अपघातात एक युवक व युवती गंभीर जखमी झाली. हा अपघात गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास झाला.
कोमल बापूराव पाटील (२५, रा. बोरखळ, ता. सातारा), असे अपघातात ठार झालेल्या युवतीचे, तर प्राजक्ता दिलीप साबळे (२४), अमर दीपक शिर्के (२४, दोघेही रा. मार्केट यार्ड परिसर, सातारा) अशी जखमींची नावे आहेत.
कास पठारावर शुक्रवारी दुपारी कोमल पाटील, प्राजक्ता साबळे आणि अमर शिर्के हे तिघे कारने फिरण्यासाठी गेले होते. फिरून झाल्यानंतर तिघेही कारने साताऱ्याकडे यायला निघाले. कास रस्त्यावरील गणेशखिंड परिसरात आल्यानंतर अमरचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार घाटातून थेट दोनशे फूट दरीत कोसळली. घाटात कार कोसळत असतानाच कार चालवणारा अमर व पाठीमागे बसलेली प्राजक्ता कारमधून बाहेर फेको गेले. त्यामुळे दोघांचेही प्राण वाचले. मात्र, या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. बाहेर फेकला गेलेला अमर जखमी अवस्थेत दरीवर आला. यानंतर या अपघाताची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी ट्रेकर्सनाही पाचारण केले. ट्रेकर्सनी कोमल पाटील हिचा मृतदेह दरीतून वर काढला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला.
हा अपघात झाला त्यावेळी कोमल पाटील ही चालकाशेजारी बसली होती. कार दरीत कोसळल्यानंतर पुढच्या काचेतून कोमल आणखी शंभर फूट खाली बाहेर फेकली गेली. त्यामुळे तिच्या डोक्याला गंभीर जखम झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले.
----------------------
नातेवाईकांचा आक्रोश...
कोमल पाटील हिचा अपघातात मृत्यू झाल्याचे समजताच तिचे नातेवाईक व ग्रामस्थांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेतली. कोमलचा मृतदेह पाहून नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला. हा आक्रोश मन हेलावणारा होता.