कोल्हापूर : जिल्हा परिषदेकडे ४० लाख रुपयांचे मोबाइल मेडिकल युनिट दाखल झाले आहे. आजरा, भुदरगड आणि चंदगड तालुक्यातील ५४ दुर्गम गावांना या वैद्यकीय सेवेचा फायदा होणार आहे. केंद्र शासनाकडून कोल्हापूर जिल्ह्यासाठी हे युनिट मंजूर झाले आहे. यामध्ये एक सुसज्ज मोठी व्हॅन आणि डॉक्टर व अन्य कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र वाहन अशा दोन वाहनांचा समावेश आहे.
सध्या जिल्ह्यातील पन्हाळा, शाहूवाडी आणि गगनबावडा तालुक्यातील दुर्गम वाड्यांसाठी डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या सहयोगातून ही सेवा दिली जाते. अशाच पद्धतीने आजरा, भुदरगड आणि चंदगड तालुक्यातील दुर्गम आणि डोंगराळ गावांसाठी सेवा देण्यासाठीच्या युनिटची मागणी अमित सैनी जिल्हाधिकारी असताना प्रस्तावाच्या माध्यमातून करण्यात आली होती.
चार वर्षानंतर हा प्रस्ताव मंजूर झाला असून, या दोन्ही गाड्या कोल्हापुरात दाखल झाल्या आहेत. वरील तिन्ही तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रे असली तरी अनेक वाड्या वस्त्यांवरील नागरिकांना किरकोळ आजारासाठी काही मैलांचे अंतर चालत यावे लागते. ग्रामस्थांचा हा त्रास यामुळे वाचणार असून, हे मोबाइल मेडिकल युनिट वेळापत्रकानुसार गावातच येऊन ग्रामस्थांची तपासणी करणार आहे.
चौकट
काय आहे या युनिटमध्ये
प्रसूतीसाठीचे टेबल, फ्रीज, लॅबसाठी आवश्यक असलेले सर्व साहित्य, औषधे आणि प्रथमोपचारासह आवश्यक असणारे सर्व साहित्य या युनिटमध्ये उपलब्ध असणार आहे. या युनिटच्या वाहनाला दोन कॅमेरे असून, गावात आल्यानंतर ग्रामस्थांना माहिती मिळावी, यासाठी सायरन वाजवला जाईल.
चौकट
डॉक्टरांसाठी स्वतंत्र वाहन
या युनिटसोबत वेैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि दोन वाहनांचेे दोन वाहनचालक असतील. या फिरत्या दवाखान्यात सेवा देणाऱ्यांसाठी स्वतंत्र वाहन असून, एकाच वेळी गावात ही दोन वाहने दाखल होतील आणि ग्रामस्थांना सेवा देतील. एक महिन्यानंतर त्यांनी दिलेल्या सेवेचा आढावा घेतला जाईल.
चौकट
या होणार चाचण्या
या मोबाइल युनिटमध्ये गरोदर मातांच्या सर्व प्रकारच्या चाचण्या करण्यात येणार आहे, तसेच गरज असल्यास ग्रामस्थांच्या रक्त, लघवीच्या चाचण्याही केल्या जातील. हिमोग्लोबिनपासून ते थायरॉईडपर्यंतच्या चाचण्या या माध्यमातून करण्यात येणार आहेत.
०९०६२०२१ कोल मोबाइल मेडिकल युनिट १/२
कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी केंद्र सरकारच्यावतीने नवे मोबाइल मेडिकल युनिट मंजूर करण्यात आले आहे. अशा पद्धतीने या युनिटच्या आतमध्ये रचना करण्यात आली आहे.