२०० निक्षय मित्र झाले अन्नदाता; क्षयरुग्णांसाठी पोषण आहार किट वितरण
By हरी मोकाशे | Published: March 4, 2024 06:48 PM2024-03-04T18:48:24+5:302024-03-04T18:52:10+5:30
क्षयरुग्णांना मोफत औषधींबरोबर आता पोषक आहार देण्यात येत आहे.
लातूर : क्षयरुग्णांना शासनाकडून औषधी मिळत असली तरी प्रथिनेयुक्त आहारही महत्त्वाचा आहे. तो उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा परिषदेने अन्नदाता उपक्रम हाती घेतला आहे. याअंतर्गत पहिल्या टप्प्यात २०० निक्षय मित्र झाले असून त्यांनी दिलेल्या आहाराच्या किटचे सोमवारी वितरण करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर स्थायी सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अस्लम तडवी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, जावेद शेख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे, लघुपाटबंधारे व पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेलार, बांधकामचे प्रभारी कार्यकारी अभियंता अभय देशपांडे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना पंडगे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एस.एन. तांबारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षवर्धन राऊत, नरेगाचे सहा. गटविकास अधिकारी संताजी माने आदी उपस्थित होते. प्रास्ताविक डीएचओ डॉ. एच.व्ही. वडगावे यांनी केले.
क्षयरुग्णांना नेहमी मदत करु...
सीईओ अनमोल सागर म्हणाले, क्षयरुग्णांना मोफत औषधींबरोबर आता पोषक आहार देण्यात येत आहे. त्यामुळे क्षयरुग्णांना आजारावर मात करणे सोपे होईल. तसेच या रुग्णांना नेहमी मदत करण्यात येईल. अन्नदाता उपक्रमात अधिकारी, कर्मचाऱ्यांबरोबर नागरिक, सेवाभावी संस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले. तर डेप्युटी सीईओ नितीन दाताळ म्हणाले, सर्व अधिकारी व कर्मचारी नियमित काम करतात. या उपक्रमामुळे आपल्यासह कुटुंबियांकडून रुग्णांना मदत करता आली. यापुढेही मदत केली जाईल, असे सांगितले.