तलावातून ३ लाख घनमीटर काढला गाळ; लातूर जिल्ह्यातील ७५८ एकर क्षेत्र झाले सुपिक
By हरी मोकाशे | Published: July 8, 2023 05:48 PM2023-07-08T17:48:48+5:302023-07-08T17:49:07+5:30
धरणांतील साचलेला गाळ उपसा करुन तो शेतात पसरविल्यास धरणांची पाणी साठवण क्षमता पुनर्स्थापित होण्याबरोबरच कृषि उत्पन्नात भरीव वाढ होणार आहे.
लातूर : गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प व तलावावून दीड महिन्यात ३ लाख ३ हजार २४३ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. हा गाळ शेतामध्ये पसरविण्यात आल्याने ७५८ एकर क्षेत्र सुपिक झाले आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्याबरोबरच शेतीचे उत्पन्न वाढणार आहे.
राज्यात धरण, प्रकल्पांची मोठ्या प्रमाणात संख्या आहे. मात्र, या धरणांमध्ये दरवर्षी साठत असलेल्या गाळामुळे धरणांच्या साठवण क्षमतेत घट झाली आहे. धरणांतील साचलेला गाळ उपसा करुन तो शेतात पसरविल्यास धरणांची पाणी साठवण क्षमता पुनर्स्थापित होण्याबरोबरच कृषि उत्पन्नात भरीव वाढ होणार आहे. त्यामुळे राज्यात 'गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार' ही योजना राबविण्यास सुरुवात झाली.
यंदा अल निनोमुळे पाऊस सरासरीपेक्षा कमी पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे ही योजना प्रभावीपणे राबविली जात आहे. यापूर्वी या योजनेत शासनाकडून केवळ इंधन खर्च देण्यात येत होता. मशीन खर्च स्वयंसेवी संस्था तर गाळ पसरविण्यासाठीचा वाहतूक खर्च शेतकरी स्वतः करीत होते. 'गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार' योजनेअंतर्गत यंदा शासनाकडून यंत्रसामुग्री आणि इंधन दोन्हीचा खर्च देण्यात येत आहे.
लोकसहभागातूनही गाळ उपसा...
जिल्ह्यात १७ मे ते १ जुलै या कालावधीत लोकसहभागातून रेणापूर, उदगीर, अहमदपूर, लातूर, औसा व निलंगा तालुक्यातील रेणापूर मध्यम प्रकल्प, गुत्ती साठवण तलाव, गुडसूर तलाव, तिरु मध्यम प्रकल्प, सोनखेड साठवण तलाव, सलगरा तलाव, भादा, वांगजी, बिरवली, तांबाळा येथील पाझर तलावातून गाळ उपसा करण्यात आला आहे.
३० कोटी लिटरने वाढली पाणी साठवण क्षमता...
गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियानाअंतर्गत औसा व निलंगा, तसेच गोंद्री, खुंटेगाव साठवण तलाव, मसलगा मध्यम प्रकल्प व निम्न तेरणा प्रकल्प, एकुर्का लघु पाटबंधारे तलाव, कल्लूर तलावातून गाळ काढला आला. लोकसहभाग आणि याेजनेतून एकूण ३ लाख ३ हजार २४३ घनमीटर एवढा गाळ काढण्यात आला आहे. हा गाळ जवळपास ७५८ एकर क्षेत्रावर पसरविण्यात आला आहे. त्यामुळे ३० कोटी ३२ लाख लिटर एवढ्या पाणीसाठ्यात वाढ होणार आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. या उपक्रमास शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.