लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस घटत असून, गुरुवारी फक्त ३५ बाधित रुग्ण आढळले आहेत. आता बाधितांच्या आलेख ९० हजार ५५८वर पोहोचला असून, यातील ८७ हजार ९६४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत फक्त २९० रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. दरम्यान, आतापर्यंत दोन हजार चारशे चारजणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत बुधवारी ६६९ रुग्णांची चाचणी करण्यात आली. त्यात १३ रुग्ण आढळले तर १ हजार ४६५ जणांची रॅपिड ॲन्टिजन चाचणी करण्यात आली. त्यात २२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एकूण २ हजार १४५ चाचण्यांमध्ये ३५ रुग्ण आढळले आहेत. दिवसेंदिवस रुग्णसंख्या कमी होत असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३ टक्के असून, रुग्ण दुपटीचा कालावधी ६१० दिवसांवर गेला आहे. यामुळे जिल्ह्याला चांगला दिलासा मिळाला आहे. दैनंदिनी पॉझिटिव्हिटी रेट १.९ टक्के आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, जिल्हा नेत्रशल्य चिकित्सक डॉ. श्रीधर पाठक यांनी दिली.