लातूर जिल्ह्यात ई-पीक पाहणीकडे ३५ टक्के शेतकऱ्यांची पाठ !
By संदीप शिंदे | Published: March 2, 2023 05:27 PM2023-03-02T17:27:50+5:302023-03-02T17:28:45+5:30
दोनवेळा मुदतवाढ देऊनही नोंदणी रखडली
लातूर : शेतातील पिकाची माहिती ऑनलाईन नोंदविता यावी, पिकविमा, नैसर्गिक आपत्ती ओढावल्यास शासकीय मदत देण्यासाठी सुसूत्रता यावी, यासाठी शासनाच्यावतीने ई-पीक पाहणीचा उपक्रम राबविण्यात आला होता. नोंदणीसाठी दोनवेळेस मुदतवाढही देण्यात आली होती. मात्र, अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने जिल्ह्यात केवळ ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे, तर ३५ टक्के शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीच केली नसल्याचे समोर आले आहे.
ई-पीक पाहणीमध्ये शेतकऱ्यांना मोबाईल ॲपद्वारे शेतातील पिकांचा फाेटो काढून अपलोड करावा लागणार होता. त्यानुसार कृषी, महसूल विभागाच्यावतीने जनजागृतीही करण्यात आली होती. जिल्ह्यात रब्बी हंगामातील ई-पीक पाहणीसाठी ३ लाख ३४ हजार ६२ हेक्टर प्रस्तावित होते. यापैकी २ लाख १७ हजार ८०४ हेक्टरवर पीक पाहणी क्षेत्र मंजूर झाले होते. दरम्यान, जिल्ह्यात फेब्रुवारी अखेरपर्यंत ६५.२० टक्केच ई-पीक पाहणी पूर्ण झाली आहे. यामध्ये अहमदपूर तालुक्यात ७४ टक्के, उदगीर ७१, औसा ५८, चाकूर ६८, जळकोट ६२, देवणी ७१, निलंगा ५४, रेणापूर ७१, लातूर ६९, तर शिरुर अनंतपाळ तालुक्यात ७७ टक्के क्षेत्रावरील पाहणी पूर्ण झाली आहे.
ॲपद्वारे पिकांची अचूक नोंद...
सातबारा उताऱ्यावर दरवर्षी शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या पिकाची नोंद तलाठी, मंडल अधिकारी यांच्यातर्फे करण्यात येते. राज्य शासनातर्फे मागील वर्षीपासून ई-पीक पाहणी ॲपद्वारे पीक नोंदणी उपक्रम राबविण्यात आला. त्यामुळे प्रत्यक्ष शेतात जाऊन ॲपद्वारे फोटो अपलोड करावा लागत असल्याने पिकांची अचूक नोंद होत आहे. त्यामुळे पिकविमा, शासकीय अनुदान मिळण्यास अडचणी येणार नाही, हा उद्देश या ई-पीक पाहणीचा आहे.
नोंदणीत लातूर तालुका आघाडीवर...
ई-पीक पाहणी हा शासनाच्यावतीने राबविण्यात येणारा उपक्रम असून, जनजागृतीसाठी महसूल प्रशासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात सर्वाधिक ई-पीक पाहणी लातूर तालुक्यात ७७.३६ टक्के झाली आहे, तर सर्वात कमी ई-पीक पाहणी निलंगा तालुक्यात झाली आहे. दरम्यान, शासनाकडून पाहणीसाठी वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, तरीही अनेक शेतकऱ्यांनी याकडे पाठ फिरविली आहे.