शालेय खेळाडूंच्या कौशल्य वाढीसाठी ४ कोटींचे क्रीडा साहित्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:14 AM2021-07-04T04:14:57+5:302021-07-04T04:14:57+5:30
लातूर : अधिकाधिक शालेय खेळाडू क्रीडाक्षेत्राकडे आकर्षित व्हावेत या उद्देशाने क्रीडांगण विकास अनुदानांतर्गत जिल्ह्यातील २१६ शाळांतील शालेय विद्यार्थ्यांना ४ ...
लातूर : अधिकाधिक शालेय खेळाडू क्रीडाक्षेत्राकडे आकर्षित व्हावेत या उद्देशाने क्रीडांगण विकास अनुदानांतर्गत जिल्ह्यातील २१६ शाळांतील शालेय विद्यार्थ्यांना ४ कोटी ३५ लाखांचे क्रीडा साहित्य वाटप करण्यात येत आहे. यामुळे जिल्ह्यातील शालेय खेळाडूंच्या कौशल्य बळकटीसाठी मदत होणार आहे. जिल्हा क्रीडा कार्यालयांतर्गत २०१९-२० व २०२०-२१ या वर्षातील सर्वसाधारण व विशेष घटक योजनेंतर्गत क्रीडांगण विकास अनुदान देण्यात येणार आहे. या अंतर्गत ४ कोटी ३५ लाख रुपयांचे क्रीडा साहित्य व विविध खेळांची मैदाने तयार करणे, प्रसाधनगृह व चेंजिंग रुम बांधणे, क्रीडांगण समपातळी करणे, क्रीडांगणाभोवती तारेचे कुंपण घालणे आदी बाबी आहेत. यातील ८० टक्के निधी शालेय विद्यार्थ्यांच्या क्रीडा साहित्यासाठी वापरण्यात येणार आहेत. त्या अंतर्गत सर्वसाधारण गटातील १९-२० या वर्षात १ कोटी तर २०-२१ या वर्षात १ कोटी ६० लाखांचे अनुदान देण्यात आले आहे. विशेष घटक योजनेंतर्गत २०१९-२० सालासाठी २५ लाख तर २०-२१ सालासाठी १ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर झाला असून, या अंतर्गत साहित्य वाटप करण्यात येत आहेत. दोन वर्षांतील सर्वसाधारण व विशेष घटकातील अनुदान ४ कोटी ३५ लाखांच्या जवळजवळ आहे. यात विविध खेळांचे क्रीडा साहित्य, शारीरिक क्षमता वाढविण्याची यंत्रसामुग्री, प्रशिक्षणाचे साहित्य, मोजमापासाठीचे यंत्र आदींसह अन्य साहित्याचा यात समावेश आहे. क्रीडांगण विकास अनुदानांतर्गत यात साहित्य व क्रीडा विकासासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानामुळे जिल्ह्यातील शालेय व महाविद्यालयातील खेळाडूंना याचा लाभ होणार आहे.
जि.प.च्या शाळा सर्वाधिक...
या योजनेंतर्गत जिल्ह्यातील २१६ शाळांना अनुदान देण्यात येणार असून, ६५ टक्के शाळा जिल्हा परिषदेच्या यासाठी पात्र झाल्या आहेत. यासह विविध संस्था व महाविद्यालयांचा यात समावेश राहणार आहे. सर्वसाधारण गटात दोन वर्षांत १५२ शाळांना अनुदान देण्यात येणार असून, विशेष घटकातील ६४ शाळांना याचा लाभ मिळणार आहे.
व्हॉलिबॉल मैदान दुरुस्तीला मुहूर्त कधी...
सन २०१९-२० अंतर्गत सर्वसाधारण गटात क्रीडा संकुलातील व्हॉलिबॉल मैदान दुरुस्तीसाठी ७ लाखांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. मात्र अद्यापि या मैदान दुरुस्तीला सुरुवात झाली नाही. बजेट मंजूर होऊनही काम सुरू नसल्याने खेळाडूत नाराजी आहे. लातुरात व्हॉलिबॉलचे अनेक क्लब आहेत. उदयोन्मुख खेळाडूंचाही भरणा आहे. मात्र मैदान दुरुस्ती झाली नसल्याने व्हॉलिबॉल प्रेमीत असंतोष आहे.
साहित्याचा दर्जा तपासावा...
या योजनेंतर्गत २०१९-२० या वर्षातील क्रीडा साहित्य जवळपास अनेक शाळांना वाटप करण्यात आले आहे. उर्वरित २०२०-२१ चे ही वाटप लवकरच होईल. शाळेतील मुख्याध्यापक तसेच क्रीडा शिक्षकांनी साहित्य मोजून घेऊन त्याचा दर्जा तपासावा असे जिल्हा क्रीडाधिकारी महादेव कसगावडे यांनी सांगितले.