अहमदपूर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रुग्णांसाठी पुरेशा खाटा उपलब्ध होत नसल्याने त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी रेफर करावे लागत आहे. अहमदपुरात १०० खाटांचे रुग्णालय सुरु करण्याच्या हलचाली थंडच असल्याचे वृत्त लोकमतमधून प्रकाशितच होताच आमदार बाबासाहेब पाटील यांनी उपजिल्हाधिकारी व तहसीलदारांसोबत चर्चा करून शिरूर ताजबंद येथील स्वामी विवेकानंद अध्यापक महाविद्यालयाच्या महिला वसतिगृहाच्या इमारतीत तात्पुरते ऑक्सिजनयुक्त ५० खाटांचे रुग्णालय उभा करण्यासंदर्भात पाहणी केली.
तालुका आरोग्य प्रशासन व धन्वंतरी रुग्णालय उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने सदर रुग्णालय कार्यान्वित होणार असून त्यासाठी आवश्यक असणारे ऑक्सिजन पाईपलाईन, ऑक्सिजन सिलेंडर, कर्मचारी व आवश्यक असलेली औषधी याविषयी जिल्हा प्रशासनाशी चर्चा केली. याबाबत सर्व उपकरणे उपलब्ध झाल्यानंतर लवकरच सदर रुग्णालय कार्यान्वित होणार आहे. त्याचा लाभ अहमदपूर व चाकुर परिसरातील रुग्णांना होणार आहे. यावेळी आमदार बाबासाहेब पाटील, उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, तलाठी श्याम कुलकर्णी, सरपंच कोंडीबा पडोळे आदी उपस्थित होते.
सर्वच रुग्णांना लाभ मिळणार...
अहमदपूर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या १६०० पेक्षा अधिक झाली आहे. त्यामुळे काही रुग्णांना अन्यत्र जावे लागत आहे. तसेच ग्रामीण भागातील रुग्णांचे हाल होत आहेत. त्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर व तात्पुरते ऑक्सिजनयुक्त ५० खाटांचे रुग्णालय उभारण्याविषयी तयारी करण्यात येत असल्याचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.
इमारत, यंत्रणेची पाहणी...
ऑक्सिजनयुक्त ५० खाटांचे रुग्णालय उभारण्यासंदर्भात शिरूर ताजबंद येथे पाहणी करण्यात आली. ऑक्सिजन पाईपलाईन व इतर बाबी उपलब्ध करण्याविषयी आमदार व जिल्हा प्रशासनाशी चर्चा सुरु आहे. ती झाल्यानंतर सदर रुग्णालय सुरु करण्यात येईल, असे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले.