६०९ खेळाडू विद्यार्थ्यांना मिळणार ग्रेस गुणांचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:14 AM2021-07-02T04:14:31+5:302021-07-02T04:14:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : कोरोनामुळे चालू वर्षी शालेय तथा संघटनेच्या क्रीडा स्पर्धा झाल्या नाहीत. त्यामुळे क्रीडा गुण मिळणार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : कोरोनामुळे चालू वर्षी शालेय तथा संघटनेच्या क्रीडा स्पर्धा झाल्या नाहीत. त्यामुळे क्रीडा गुण मिळणार की नाही, हा प्रश्न होता. मात्र राज्याच्या शालेय, शिक्षण व क्रीडा विभागाने खेळाडूंचे हित लक्षात घेता क्रीडा गुण देण्याचे ठरविले. त्यानुसार यंदाच्या वर्षात जिल्ह्यातील ६०९ खेळाडू विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मागील कामगिरीच्या जोरावर क्रीडा ग्रेस देण्याचे ठरविले असून, सन २०२०-२१ वर्षात परीक्षा दिलेल्या दहावी व बारावीच्या खेळाडू विद्यार्थ्यांना यामुळे लाभ मिळणार आहे. दहावी परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांना इयत्ता आठवी व नववीमधील खेळलेल्या कामगिरीच्या आधारावर गुण मिळणार आहेत. तर बारावी परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांना अकरावीतील क्रीडा स्पर्धेतील सहभाग व प्रावीण्य ग्राह्य धरले जाणार आहे. यानुसार जिल्ह्यातील ६०९ खेळाडू विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. शालेय व संघटनास्तरावरील प्रतिनिधित्व केलेल्या खेळाडूंना हे ग्रेस गुण मिळणार आहेत. लातूर जिल्ह्यातील इयत्ता दहावीच्या शालेय स्पर्धेतील ३५९ तर संघटनास्तरावरील ५१ अशा एकूण ४१० खेळाडूंना लाभ मिळणार आहे. बारावीतील शालेय स्तरावर खेळलेल्या १९८ व संघटनास्तरावरील १ अशा १९९ खेळाडूंना क्रीडा गुणदान मिळणार आहेत.
खेळाडू प्रशिक्षकांत समाधान
स्पर्धा न झाल्याने क्रीडा गुण मिळणार की नाही, हा प्रश्न होता. मात्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने खेळाडूंचे हित लक्षात घेता मागील कामगिरी ग्राह्य धरीत गुण देण्याचे ठरविले. त्यामुळे जिल्ह्यातील खेळाडू प्रशिक्षकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
शिक्षण मंडळाकडे प्रस्ताव
विविध खेळाडूंमार्फत जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या शिफारशींसह लातूरच्या विभागीय शिक्षण मंडळाकडे इयत्ता दहावी व बारावीच्या खेळाडू विद्यार्थ्यांचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. त्यामुळे पात्र खेळाडूंना याचा लाभ मिळणार आहे.
विविध खेळांतील खेळाडूंना लाभ...
इयत्ता दहावी आणि बारावीअंतर्गत विविध खेळांतील खेळाडूंना याचा लाभ मिळणार असून, प्रस्तावात वुशू, व्हॉलिबॉल, सिकई, खो-खो धनुर्विद्या, कबड्डी, मैदानी, बॉल बॅडमिंटन, कराटे, नेटबॉल, शूटिंग बॉल, सॉफ्ट बॉल, टेनिक्वाईड, किक्बॉक्सिंग, आट्यापाट्या, फुटबॉल, सेपक टकरा, डॉज बॉल, योगा, कुस्ती, बुद्धिबळ, वेटलिफिक्टिंग, ज्यूदो, तलवारबाजी, थ्रो बॉल, बेस बॉल, हॉकी, हँडबॉल, स्क्वॅश, तायक्वाँदो, जलतरण, रायफल शुटिंग, मल्लखांब, बास्केटबॉल, कॅरम आदी खेळांचा समावेश असून, जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीयस्तरावर खेळलेल्या खेळाडूंचा प्रामुख्याने समावेश आहे.