लातूर : जिल्ह्याच्या मतदारयादीत समान नाव, समान चेहरा असलेले ६१३ मतदार असल्याचे मतदारयादी शुद्धीकरण मोहिमेत निदर्शनास आले आहे. त्यामुळे केंद्रस्तरीय मतदान अधिकाऱ्यांकडून याची पडताळणी करण्यात येत असून, सदर मतदार डबल असल्यास ती वगळली जाणार आहेत. शिवाय, यादीतील ३१ हजार ७२० मतदारांच्या नावांपुढे छायाचित्र नसल्याचेही निदर्शनास आले आहे. शुद्धीकरण मोहिमेत भौगोलिक समान नोंदी, तांत्रिक चुका आणि छायाचित्र नसणे या तीन मुद्यांची तपासणी होत आहे. भौगोलिक समान नोंदीमध्ये जिल्ह्यात ६१३ मतदार आढळले आहेत. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये २२६ मतदारांची नावे समान आणि चेहरे समान आहेत. लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये समान नावे आणि समान चेहरा असलेले ३२३ मतदार आढळले आहेत. अहमदपूर विधानसभा मतदारसंघात २६, निलंगा विधानसभा मतदारसंघात ३५, औसा विधानसभा मतदारसंघात २ आणि उदगीर विधानसभा मतदारसंघात एक अशा एकूण ६१३ मतदार समान नाव व समान चेहऱ्याची असल्याचे निदर्शनास आले आहेत.
छायाचित्र नसणारे मतदार स्थलांतरित
छायाचित्र नसलेले मतदार कायमस्वरूपी अथवा तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित आहेत. त्यामुळेच त्यांचे नाव मतदारयादीत नाही, असे प्राथमिक पाहणीत आढळून आले आहे. ३१ हजार ७२० मतदारांचे छायाचित्र नाही. त्यात लातूर ग्रामीणमध्ये ६ हजार ७३५, लातूर शहर २३ हजार १३६, अहमदपूर ४५१, उदगीर २४१, निलंगा १०३८ आणि औसा विधानसभा मतदारसंघात ११९ मतदारांचे छायाचित्र नाही.
२५ ओळखपत्रांचा समान क्रमांक
शुद्धीकरण मोहिमेत तांत्रिक चुकाही आढळल्या आहेत. एकूण २५ मतदारांचा ओळखपत्रांचा क्रमांक एकसारखा आहे. एका मतदाराचा आणि दुसऱ्या मतदाराचा ओळखपत्राचा क्रमांक सारखा आहे, असे २५ ओळखपत्र असल्याचे निदर्शनास आले आहे.
तहसील कार्यालयात जमा करा छायाचित्र
ज्या मतदारांचे मतदारयादीत छायाचित्र नाही, त्या मतदारांनी तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागात जाऊन छायाचित्र द्यावे, जेणेकरून मतदारयादीमध्ये नावापुढे छायाचित्राचा समावेश होईल. छायाचित्र जमा करण्याची मुदत ५ जुलै असून, संबंधितांनी तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागात छायाचित्र जमा करावे, असे आवाहन निवडणूक विभागातील नायब तहसीलदार हरीश काळे यांनी केले आहे.