चिंचोली ब. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे गावांतील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, प्राथमिक आरोग्य केंद्राने चार दिवसांपासून गावात कोरोना चाचण्यांवर भर दिला आहे. संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिका-यांनी गाव सील करण्यास ग्रामपंचायतीस सूचना केल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीकडून गावात निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.
चिंचोली ब. प्राथमिक आरोग्य केंद्रातील इतर गावांपेक्षा भोसा गावात बाधितांची संख्या अधिक आढळून येत आहे. त्यामुळे आरोग्य केंद्राकडून कोविड चाचण्या करण्यात येत आहेत. काही नागरिक चाचणी करुन घेण्यास टाळत आहेत. मात्र, नागरिकांनी स्वत:हून चाचणी करुन घ्यावी. त्यामुळे संसर्ग रोखण्यास मदत होईल, असे आरोग्य केंद्राकडून आवाहन करण्यात आले आहे.
लक्षणे दिसणा-यांनी चाचणी करुन घ्यावी...
चिंचोली ब. प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गतच्या भोसा गावात संसर्ग वाढत आहे. आरोग्य केंद्राकडून एक दिवसाआड गावात कोविड चाचणी केली जात आहे. कोरोनाची लक्षणे असलेल्यांनी तसेच बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींनी चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय काळे यांनी केले आहे.