'जय हरी'चा जयघोष; डोंगरशेळकीत समर्थ धोंडूतात्या महाराजांचे भाविकांनी घेतले दर्शन
By हरी मोकाशे | Published: June 29, 2023 07:29 PM2023-06-29T19:29:46+5:302023-06-29T19:29:59+5:30
ग्रामीण भागातील वारकऱ्यांच्या दिंड्या पताके घेऊन टाळ- मृदंगांच्या गजरात श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांचे नामस्मरण करीत येत होत्या.
डोंगरशेळकी : विठ्ठल- विठ्ठल जय हरी, श्री समर्थ धोंडूतात्या महाराज की जय अशा जयघोषात मराठवाड्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंगरशेळकी येथील श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांच्या समाधीचे आषाढी एकादशीनिमित्ताने दोन लाखापेक्षा अधिक भाविकांनी गुरुवारी मनोभावे दर्शन घेतले. भाविकांमुळे भक्तीचा मळाच फुलला होता.
पहाटे ५ वा. उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांच्या हस्ते महापूजा, आरती करण्यात आली. यावेळी वारकरी भक्तांमधून महापूजेचा मान पंडित पांडुरंग बिरादार या दांपत्यास मिळाला. यावेळी मंदिराचे विश्वस्त व्यंकटराव मुंढे, बाबुराव घटकार, पुजारी अनिल कुलकर्णी, चेअरमन हणमंतराव मुंढे, व्हा. चेअरमन प्रा. ज्ञानोबा गुरमे, भालचंद्र शेळके, मारोती मुंढे, ज्ञानोबा मुंढे, व्यंकटराव मरलापल्ले, हणमंत हंडरगुळे, गणेश मुंढे, तलाठी नकाते यांच्यासह भाविकांची उपस्थिती होती. दुपारी खा. सुधाकर शृंगारे, जिल्हा परिषदेेच माजी अध्यक्ष राहुल केंद्रे, माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांनी पूजा करुन आरती केली. यावेळी गणेश गायकवाड, बालाजी गवारे, उदयसिंह ठाकूर आदी उपस्थित होते.
अनवाणी पायांनी येऊन नतमस्तक...
श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांच्या दर्शनासाठी भाविक अनवाणी पायांनी येत होते. तसेच मिळेल त्या वाहनांनी भाविक येत होते. उदगीर आगाराचे प्रमुख सतीश तिडके, अनिल पळनाटे यांनी भाविकांसाठी एसटीची सुविधा उपलब्ध केली होती. तसेच वाढवण्याचे पीएसआय मुरारी गायकवाड, सपाेनि. विठ्ठल गुरपदे यांच्यासह ४० पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
नेत्र तपासणी, रक्तदान शिबीर...
उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालयाच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबिर घेण्यात आले. यावेळी डॉ. सुदाम बिरादार, डॉ. महेश वर्मा, गणेश मुंढे यांनी परिश्रम घेतले. तसेच रक्तदान शिबीर घेण्यात आले. भाविकांच्या आरोग्य सुविधेसाठी उपकेंद्राच्या वतीने एक पथक नियुक्त करण्यात आले होते.
टाळ- मृदंगाचा गजर...
ग्रामीण भागातील वारकऱ्यांच्या दिंड्या पताके घेऊन टाळ- मृदंगांच्या गजरात श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांचे नामस्मरण करीत येत होत्या. भाविकांसाठी चहा पाण्याची सोय चंद्रकांत मुंढे, बालाजी नवलगीरे यांनी तर फराळाची व्यवस्था मंदिर समितीने केली होती.