मांजरा नदीपात्रातील पाण्यात बुडून एका मेंढपाळाचा मृत्यू
By राजकुमार जोंधळे | Published: March 3, 2024 08:13 PM2024-03-03T20:13:00+5:302024-03-03T20:23:50+5:30
लातूर तालुक्यातील सलगरा (बु.) येथील घटना...
राजकुमार जाेंधळे / लातूर : मेंढ्यांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या एका मेंढपाळाचा मांजरा नदीपात्रातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. ही घटना लातूर तालुक्यातील सलगरा (बु.) शिवारात घडली. जवळपास तीन तासांच्या प्रयत्नानंतर मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात पाेलिस आणि स्थानिक नागरिकांना यश आले. याबाबत लातूर ग्रामीण पाेलिस ठाण्यात सायंकाळी नाेंद करण्यात आली आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातूर तालुक्यातील सलगरा येथील प्रकाश पंडित गायके (वय ३४) हा रविवारी सकाळी मेंढ्या चालण्यासाठी सलगरा शिवारात गेला हाेता. दरम्यान, दुपारी १२ वाजेच्या सुमारास ताे मेंढ्यांना पाणी पाजण्यासाठी मांजरा नदीपात्रातील एका डाेहाकडे गेला. यावेळी काही मेंढ्यांना ताे धुण्यासाठी पाण्यात उतरला. पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती लातूर ग्रामीण ठाण्याच्या पाेलिसांना मिळाली. पाेलिसांनी घटनास्थळी भेट देऊन जवळपास तीन तास प्रयत्न करून स्थानिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला, अशी माहिती पाेलिस निरीक्षक प्रेमप्रकाश माकाेडे यांनी दिली.
याबाबत लातूर ग्रामीण पाेलिस ठाण्यात भगवान पंडित गायके (वय ३२) यांनी दिलेल्या माहितीवरून आकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे. तपास पाेलिस अमलदार सुरनर करत आहेत.