लातूर : शिक्षकांचे विषयज्ञान वृद्धिंगत व्हावे तसेच विद्यार्थ्यांना चौफेर अद्ययावत ज्ञान देण्यासाठी क्षमता अधिक दृढ व्हावी म्हणून तत्कालीन विभागीय आयुक्तांच्या संकल्पनुसार शिक्षक प्रेरणा परीक्षा घेण्यात येत आहे. रविवारी शहरातील श्री देशीकेंद्र विद्यालयातील दोन केंद्रावर झालेल्या या परीक्षेला ४२२ पैकी केवळ १८७ शिक्षकांनी उपस्थिती दर्शविली तर २३५ शिक्षक अनुपस्थित होते.लातूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १२७७ शाळा असून, या शाळांवर ५ हजार ५९२ शिक्षक कार्यरत आहेत. तसेच अनुदानित खासगी शाळेवर ९ हजार २३९ शिक्षक आहेत. एकूण १४ हजार ८३१ शिक्षकांपैकी ४२२ जणांनी शिक्षक प्रेरणा परीक्षेस होकार दिला होता. तर उर्वरित शिक्षकांनी परीक्षा देण्यास नकार दिला आहे.
रविवारी सकाळी १० ते ११ आणि दुपारी ११.३० ते १२.३० या कालावधीत झालेल्या परीक्षेला ४२२ पैकी केवळ १८७ शिक्षक उपस्थित होते. तर २३५ शिक्षकांनी अनुपस्थिती दर्शविली आहे. उपस्थितीचे प्रमाण केवळ ४४ टक्के असून, सोमवारीही शहरातील श्री देशीकेंद्र विद्यालयातील दोन केंद्रांवर चार विषयांची परीक्षा होणार आहे. या परीक्षेला किती शिक्षक उपस्थित राहणार हा प्रश्न आहे. परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे अधिकारी सकाळपासूनच केंद्रावर हजर होते. या परीक्षेचा ना निकाल जाहीर हाेणार, ना कारवाई होणार तरीही हजारो शिक्षकांनी परीक्षेकडे पाठ फिरविली आहे. केंद्र संचालक म्हणून सहायक गटविकास अधिकारी विजेंद्रसिंह मुंढे, किरण कोळपे यांनी काम पाहिले.
परीक्षेतील प्रत्येक पेपर ५० गुणांचा...
शिक्षक प्रेरणा परीक्षा तत्कालीन विभागीय आयुक्तांच्या निर्णयानुसार घेण्यात येत आहे. परीक्षेसाठीच्या प्रश्नपत्रिका सीईओंकडे यापुर्वीच्या आल्या होत्या. प्रत्येक पेपर हा ५० गुणांचा असून, चार उत्तरे चुकली तर एक गुण वजा होणार आहे. एकूण ३०० गुणांची ही परीक्षा होत असून, ऐनवेळी परीक्षा देण्यास इच्छुक असणाऱ्या शिक्षकांनाही परीक्षेस बसण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र, १५ हजार पैकी केवळ ४२२ शिक्षकांनी परीक्षेस होकार दिला. त्यात परीक्षेला प्रत्यक्षात केवळ १८७ शिक्षक उपस्थित राहीले आहेत. ४४ टक्के उपस्थितीचे प्रमाण असून, ५६ टक्के शिक्षकांनी परीक्षेकडे पाठ फिरविली असल्याचे चित्र आहे.