...
बालाजीवाडी येथे कीर्तन कार्यक्रम
लातूर : देवणी तालुक्यातील बालाजीवाडी येथे प्रभाकर हिप्परगे महाराज टाकळीकर यांचे कीर्तन झाले. यावेळी हिप्परगे महाराज म्हणाले, सध्याच्या युगात प्रत्येक जण यश मिळविण्यासाठी धडपड करीत आहे. मात्र, मिळणारे यश हे चिरकाल टिकण्यासाठी आपण कोणत्या मार्गाचा अवलंब केला, हे महत्त्वाचे आहे. सध्या मोबाइलचा वापर वाढला आहे. त्यातून चिडचिडेपणा, डोळ्यांचे आजार, मन:शांतीचा अभाव, आठवण न राहणे, कौटुंबिक सौख्य हरवत चालल्याचे दिसून येत आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी भाविकांची उपस्थिती होती.
...
कुमठा खु.- हेर रस्त्याची झाली चाळणी
उदगीर : हेर ते कुमठा खु. रस्त्याची चाळणी झाली आहे. जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. नवीन वाहनधारकांना खड्ड्यांची माहिती नसल्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. छोट्या वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. खड्ड्यांमुळे अपघाताची भीती व्यक्त होत आहे. संबंधितांनी याकडे लक्ष देऊन तात्काळ रस्ता दुरुस्त करावा, अशी सातत्याने मागणी हाेत आहे.
...
रेणापुरात माझी वसुंधरा अभियान
रेणापूर : येथील शिवाजी महाविद्यालय व नगर पंचायतीच्या वतीने माझी वसुंधरा अभियानांतर्गत कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आर.एस. अवस्थी होते. यावेळी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी मंगेश शिंदे, अशोक स्वामी, सुहास आगलावे, उपप्राचार्य प्रा. मारुती सूर्यवंशी उपस्थित होते. आभार प्रा. सुवर्णा हालकुडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रा. वैजनाथ जाधव, प्रा. दीपक रणदिवे, विशाल इगे, श्रीनाथ बोडके, शिवराज कसबे आदींनी परिश्रम घेतले.
...
विवेकानंदा मिशन संस्थेकडून श्रमदान
औसा : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त तालुक्यातील लोहटा येथे विवेकानंदा मिशनच्या वतीने श्रमदान करून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी डॉ. किशन ठाकूर, विनोद माळी, लोंढे, साळुंके, सरपंच वैशाली गुंड, परमेश्वर लोंढे, किशोर सोळुंके, प्रतीक महामुनी, विनोद क्षीरसागर, बालाजी फत्तेपुरे, भरत फत्तेपुरे, गणेश घोडके, रूपसेन चव्हाण, सुभाष फत्तेपुरे, शंकर साळवे, रविकिरण चव्हाण, सूरज चव्हाण, गोविंद चव्हाण, विशाल जाधव, शिवाजी खांडेकर आदी उपस्थित होते.